लोकमान्य टिळक आणि महर्षी शिंदे - आदरयुक्त विरोधभावाचे नमुनेदार उदाहरण
समाजसुधारकांची विचारदृष्टी, कार्यपद्धती तसेच त्यांच्यातील भावसंबंधाचे त्या त्या काळसंदर्भात आकलन मांडणे गरजेचे ठरते. या परस्परसंबंधातून त्यांच्या कार्यशैलीचा काळ आणि घडामोडींचा मागोवा, पुनरालोकन समाजेतिहासाच्या दृष्टीने पाहणे कधीही महत्त्वाचे ठरते. महापुरुषांच्या विचारकार्याला त्या त्या काळाची संदर्भचौकट असते. त्यामुळे काळ, परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे पहायला हवे. सध्याचा काळ अस्मितांचा वा व्यक्तींच्या अतिप्रेमापोटी अनाठायी भळभळण्याचा काळ आहे. समाजसुधारकांच्या कार्याचे आकलन हे एकांगी व अनैतिहासिक रीतीने करण्याच्या पद्धती रूढ होत आहेत. महापुरुषांत नसणार्या विरोधभावाची चर्चा करण्यात बुध्दिमतांनाही धन्यता वाटत आहे. गांधी विरूद्ध आंबडेकर, नेहरू विरूद्ध जीना, टिळक विरूध्द शाहू, महर्षी शिंदे विरूद्ध आंबडेकर अशी विचारद्वंदे कल्पिण्यात आणि त्यात अनाठायी उर्जा घालविण्यात आधुनिक चर्चाविश्वाला रस आहे. कोण बरोबर कोण चुकीचे याची अहमिकेने वा वितंडवादाने चर्चा घडवली जाते. बर्याच वेळा त्यात पक्षपातीपणा येतो. गतसमाजेतिहा...