अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलने - पर्यायी शक्यतांचा शोध
अण्णा भाऊ साठे यांची शताब्दी सांगताप्रसंगी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाची आठवण होणे स्वाभाविक आहे. या संमेलन उभारणीकल्पनेत आणि आयोजनात कॉ.गोविंद पानसरे यांचा मोठा वाटा होता. पानसरे यांच्या प्रज्ञाशील सांस्कृतिक कार्याचा हा एक विलोभनीय आविष्कार म्हणून देखील या संमेलन संस्कृतीकडे पाहू शकतो. अण्णा भाऊंच्या 'लेखककेंद्री' साहित्य संमेलनाबद्द्ल त्यावेळी अनेकांनी नापसंती व्यक्त केली होती. मात्र संमेलनांच्या मिळालेल्या प्रतिसादप्रभावामुळे अनेक मंडळी आपणहून त्यात सहभागी झाली. पानसरे यांचा वेगवेगळी संमेलने भरविण्यामागे 'सर्व फुलं फुलू द्या' अशी व्यापक भूमिका होती. परिघावरील संमेलने साहित्याच्या समृद्धीसाठी त्यांना आवश्यक वाटत होती. त्याप्रमाणेच अण्णा भाऊंच्या नावाचे संमेलने भरविण्यामागे त्यांचा समाजबांधणी व चळवळीला उर्जा मिळावी अशी भूमिका होती. अण्णा भाऊंचे साहित्य हे भारतीय व जागतिक परिप्रेक्ष्य असणारे साहित्य होते. तसेच अण्णा भाऊंचे साहित्य हे वर्गीय, जातिअंतमुक्तीचे, बंडखोरीचे साहित्य होते. असे ते म्हणत. त्यांच्या लेखनाकडे महाराष्ट´च्या संस्कृती व्यवहाराने कमालीचे दुर्लक्ष केले व अनुयायांनी संकुचित केले म्हणून अण्णा भाऊंचे स्थान योग्य रीतीने स्थापित व्हावे अशी त्यांची धारणा होती. अण्णा भाऊंच्या वाङ्मयाचा नव्या दृष्टीने सांस्कृतिक दृष्टीने हत्यार म्हणून उपयोग व्हावा तसेच त्यांच्या वाङ्मयाचा नव्या दृष्टीने विचार व्हावा म्हणून त्यांनी या संमेलनाची आखणी केली. बौद्धिक व सामाजिक व्यवहाराने अण्णा भाऊंवरील अन्यायबोचणीचा अपराधभाव देखील त्यांच्या मनात होता.
अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलने कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, नांदेड, नागपूर, सावंतवाडी येथे यशस्वीरित्या संपन्न झाली. पानसरे यांच्या नंतर बार्शी, बेळगाव व धुळे येथे ही संमेलने झाली. कोणत्याही सोपस्कर अथवा निवडणुकांशिवाय या संमेलनाचे अध्यक्ष होते अर्जुन डांगळे, राजन गवस, रावसाहेब कसबे, दिनानाथ मनोहर, एकनाथ आव्हाड, सतीश काळसेकर, उत्तम कांबळे, माया नारकर. संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षीय भाषणांतून अण्णा भाऊंचे वाङ्मय, जीवनकार्य, समाज व चळवळीसंबंधी महत्त्वाचा विचार मांडला गेला. एका अर्थाने अण्णा भाऊंच्या वाङ्मयाची पुनर्भेट भारतीय समाजाला हितावह असल्याची मांडणी या भाषणांतून मांडली गेली. संमेलनाचा पैस अधिक व्यापक व्हावा म्हणून समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना सहभागी करून घेतले. उद्घाटक म्हणून हिंदीतील दीनानाथ सिंह, अरुण कमल, म.द. हातकणंगलेकर, गोपाळ गुरू सारखी मंडळीं या संमेलनात सहभागी झाली. संमेलनातील परिसंवादाच्या विषयापासून प्रबोधनात्मक शाहिरी कार्यक्रमापर्यंत पानसरे यांचे बारकाईने लक्ष असे. कवीसंमेलन, परिसंवाद,विशेष व्याख्यानाबरोबरच शाहिरी प्रबोधनाचा कार्यक्रम पानसरे जाणीवपूर्वक ठेवायचे. गण, पोवाडे आणि 'माझी मैने'च्या छक्कडचा खणखणाट संमेलनात व्हायचा. 'रस्त्यावरचं गाणं , चळवळीचं गाणं कवींनी लिहावे असे त्यांना वाटे. यामागे त्यांचा सामूहिक चळवळीच्या जागरप्रेरणेचा भाग होता.
या संमेलनानिमित्ताने श्रमिक प्रतिष्ठाने अण्णा भाऊंच्या वाङ्मयाचे पुनर्मुद्रण केलं. दहा पुस्तकांचा संच केवळ पाचशे रूपयात उपलब्ध करून दिला. इतरही अण्णा भाऊंची काही पुस्तके छापली. यामागे पानसरे यांची कल्पक दृष्टी होती. श्रमिक प्रतिष्ठान व लोकवाङ्मयगृहाचे यात मोठे साहाय्य असायचे. या संमेलनातून अण्णा भाऊंकडे लोकांचे लक्ष वेधले गेले. ते जसे कार्यकत्यांपासून, सुजाण वाचकांचे लक्ष वेधले गेले. त्याबरोबरच मराठीतल्या सुखवस्तु बौद्धिक परंपरेला देखील अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनाचे महत्त्व आणि वेगळेपण ध्यानात आले. कोणत्याही संस्थांची भरीव अशी आर्थिक मदत न घेता केवळ आणि केवळ श्रमकऱ्यांच्या तुटपुंज्या मदतीतून अतिशय साधेपणाने ही संमेलने पार पडली. वैभवी खर्चाचा कोणताही उधळण या संमेलनात नव्हती. मानधन, हॉटेल राहणी वा चारचाकी वाहनप्रवास खर्च वगैरेचा तर प्रश्नच नव्हता. पहिले संमेलन दहा-अकरा मे २००८ रोजी कोल्हापूरच्या न्यू कॉलेजच्या भव्य मैदानात आयोजित करण्यात आले होते. शाहुरायांच्या नगरीतून अण्णा भाऊंच्या 'महाराष्ट´वरून काया ओवाळून टाकणाऱ्या' जागराचा आरंभ केला आणि तो त्यांनी महाराष्ट्र दुमदुमविला. अण्णा भाऊंच्या नावाच्या संमेलनानंतर त्यांना बाबूराव बागूल आणि नारायण सुर्वे यांच्या नावाच्या संमेलने घ्यावीत असा घाट मनात घोळत होता.
पहिल्या संमेलनापासून शेवटच्या संमेलनांपर्यत त्या काळातील त्याच्या कार्यशैलीचा मला जवळून अनुभव आला आहे. संमेलन काळातील दोनेक महिने त्यांच्या इतर सामाजिक कामाबरोबर या कामाला अफाट गती यायची. दररोज संध्याकाळी पाच वाजता बिंदू चौकातील रेड फ्लॅग बिल्डींग मधील ऑफिसमध्ये ते बसलेले असायचे. छोट्या टेबलावर कागदावर चिरमुरे आणि शेंगदाणे पसरलेले असायचे. समोर एकदोन कार्यकर्ते वा समविचारी काम पुढे नेणारा त्यांची साथी. निरंतर फोन चालू विषय, वक्ते, ठिकाण, कोण नाही म्हणत आहे, पर्यायी शक्यता, अडचणी यावर उपायशोधणी चालू असायची. या कामात उदंड हुरूप आणि चेहऱ्यावर अमाप आनंद झरलेला दिसायचा. कोणत्याही परिस्थितीत अंतरिक निष्ठेने आणि सामूहिक तळमळीने पत्करलेले काम तडीस न्यायचे असा मूठ वळवलेला ठाम विश्वास कायम दिसायचा. या कामासंबंधी अनेकांशी बोलत राहणं, संवादात रममाण असायचे. निरंतर काम हीच विश्रांती ही त्यांची धारणा होती. मधुनच सतीश काळसेकर, उत्तम कांबळे, जयप्रकाश सावंत, प्रकाश विश्वासराव यांना अनेक प्रकारची माहिती विचारून भंडावून सोडायचे. दिवसभर त्यांच्या डोक्यात संमेलनाचा विषय असायचा. मंडप, बॅनर, पत्रिका, परिसंवाद, नियोजन,भोजन या सर्वांवर अतिशय बारकाईने लक्ष असायचे. संमेलनात एकदोनदा किरकोळ कटकटी झाल्या परंतु त्या ते सहजपणाने बाजूला करत. संमेलन काळात त्यांच्या देहबोलीला आणि 'असण्या'ला उधाण यायचे. ग्रंथदिंडीपासून समारोप समारंभापर्यत ते स्वत: पहायचे एचढेच नव्हेतर संमेलन संपल्यानंतर त्याच दिवशी बैठक घेऊन संमेलन फलश्रुतीचा व पुढील वर्षीच्या संमेलनाचा विचार करायचे. कोल्हापूर संमेलनाची स्मरणिकेस त्यानी 'घाव' (जग बदल घालुनी) असे नाव दिले होते. प्रस्थापित साहित्याची निकष व्यवस्था आणि अण्णा भाऊंचे वाङ्मय तसेच समाज बांधणीसाठी याचा काय उपयोग होऊ शकतो याचा सतत त्यांच्या मनात विचार असायचा. अण्णा भाऊ हे प्रतीक आहे आणि त्याचा राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक चळवळीसाठी उपयोग करायला पाहिजे याचे भान पानसरे यांच्या दृष्टीमध्ये होते. 'आता वळू नका/ रणि पळू नका/ कुणी चळू नका/ बिनी (आघाडी) मारायची अजून राहिली' असे अण्णा भाऊ साठे यांच्या जीवाच्या काहिलीस्वप्न तसेच उभे राहण्याचे, लढाऊपणाचे भान देणाऱ्या पानसरे यांच्या विचारांतून उभा राहिलेल्या अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे स्मरण.
रणधीर शिंदे
( दिव्य मराठी ,सोलापूर, १ ऑगस्ट, २०२०)
Comments
Post a Comment