चंद्रकांत मांडरे यांची चित्रशैली
कोल्हापूर चित्रशैलीला
कोल्हापूर स्कूल म्हणून एक वेगळी ओळख
आहे. निसर्ग, व्यक्तिचित्रे
व वास्तववादी चित्रस्कूल म्हणून तिला समृद्ध परंपरा लाभली. रांगड्या, भरड
कोल्हापूरी बाजाच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टी अभिनेते चंद्रकांत
मांडरे यांनी गाजवली. या मांडरे यांची चित्रकार म्हणूनही वेगळी ओळख आहे. भावूक डोळ्यांचा
आणि उधळमोकळ्या देहबोलीच्या अभिनयाचा साज चंद्रकांत मध्ये होता. बाबूराव पेंटर
व बाबा गजबर हे त्यांचे चित्रकलेतले गुरू होते.
चंद्रकांत यांची चित्रे प्रामुख्याने निसर्गचित्रे आहे. निसर्गाविषयी त्यांना
कमालीचे आकर्षण असावे. निसर्गातील सूक्ष्म भावस्पंदने टिपावीत असा एक त्यांचा ध्यास होता. सृष्टीतले आकार, रंगसौंदर्याची
संगती त्यांच्या चित्रांत आहे. कौंटुबिक, ऐतिहासिक, पौराणिक चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या.
विजापूरमधील ऐतिहासिक खंदकाचे चित्र, त्यातील
पाण्याचा संथ वाहता प्रवाह,
किल्ल्याच्या कमानी, हिरवीगार
झुडपे अशा चित्रांपासून ते व्यक्तिचित्रणातील चेहऱ्यावरील प्रसन्न देहबोली, डोईवर
कोल्हापूरी फेटा, गळ्यात काळा दोरा पेटी, शर्टला
गुलाबी रंगाचा हिंदोळणारा फेटा.
अशा व्यक्तिचित्रांनी त्यांचा चित्रसाज नटलेला आहे. ही
काही चित्रे जलचित्र व पावडर शेंडिगची होती. वयाच्या
विसाव्या वर्षी त्यांनी ´उषा´ चित्रक अतिशय
सुरेख पोस्टर काढले होते.
चंद्रकांत
यांच्या चित्रांत भूमिपरिसर निष्ठेला खास असे महत्त्व आहे. कोल्हापूर, गोवा, कोकण, बनारस, अमेरिका येथील काही भू-परिसराची सजीव चित्र त्यांनी
काढली. शुटिंगला अथवा फिरायला जात त्यावेळी ते चित्रांच्या स्थळ शोधासाठी भटकत.
कोल्हापूर, मालवण, गोवा, सातारा, महाबळेश्र्वर, केरळ, अमेरिका, नेपाळ व फ्रान्समधील काही स्थलावकाश त्यांच्या चित्रांत आहे. पन्हाळ्यास त्यांच्या
चित्रांत विशेष महत्त्व आहे. पन्हाळ्याच्या उंचवट्यावरून सृष्टीचा घेतलेला वेध खास असा आहे. तिथल्या अनेक ऐतिहासिक
स्थळे चंद्रकांतच्या चित्रांत विसावलेली आहेत. अंबरखाना वास्तूची भव्यता, काळ्या कुरूंद
चिरेबंदी दगडांचा रेखीव घट्टपणा नजरेत भरतो आणि ती वास्तू अंगावर धावून येते.
कोल्हापूर व परिसरातील रम्य ठिकाणे त्यांच्या आवडीची होती. त्यामुळे कोल्हापूर
भू-निसर्ग
आणि त्याचे संस्कार ठसे त्यांच्या चित्रांत आहेत. ब्रह्मपुरी टेकडीवरील भरगच्च सळसळता पर्णहीन
केवळ फिकट लालिम फुलांचा गुलमोहोर, बाजूला डोह, झाडाखाली चरणाऱ्या शेळ्या, बारकिशी झोपडी, दूरवरच्या फिकट डोंगररांगांचे हुबेहुब चित्र
आहे. महालक्ष्मी
मंदिराच्या पूर्वभागाचेही रेखीव चित्रांकन आहे. संथ प्रशांत गर्दीविरहित वाटणारा अवकाश, अंधुकशा चार पाच
पुरूष स्त्रिया, रेखीव हेमाडपंथी वास्तूचा घनदाट प्रत्यय आणि झाडांच्या सावल्यांचा झावळ्याचा नेमका
अवकाश रेखाटला आहे. एका चित्रात गुऱ्हाळाची संथ लगबग चित्रित केली आहे. कल्इईच्या बाजूला दोन गुळवे, पाचोटा वाहून नेणारे
गडी, निवांत
पहुडलेली बैलगाडी, ऊसांचा ढीग, हवेत फिकट धुराचे लोट, गुऱ्हाळ परिसराचा प्रत्यय येण्यासाठी चित्रात वापरलेला भरड मुरमाड
रंगाचा वापर आणि आकाश निळ्या रंगाचा उठावदार वापर केला आहे. कोकणातील वळणांचा
रस्ता, लाल मातीचा परिसर, गोव्यातील समुद्रकिनारा, तरफा आणि होड्यांची निःस्तब्ध किनाऱ्यावरील गर्दी, विस्तीर्ण आकाशाचा
पट चित्रित केला आहे. केरळमधील माडांच्या उंच राईच्या पार्श्र्वभूमीवरील चिमुकल्या झोपड्या तसेच अमेरिकेतील फिशमार्केटच्या
इमारतीचे शिस्तबद्ध, रेखीव स्थिर इमारतीचे चित्र डोळ्यात भरते. वाराणसीचा गजबजलेला घाट, घाटावरील मंदिरे, धर्मवातावरणाचा
फिल देणारे चित्र आहे. त्यांनी काही हुबेहुब व्यक्तिचित्रेही काढली. वडील, पत्नी व इतरही काही सुबक अशी चित्रं काढली. पावडर शेडिंगमधील
काही चित्रे होत.
ही चित्रे साठ-सत्तरच्या दशकातील आहेत. त्यामुळे त्या काळातील कोल्हापूरच्या जीवनशैलीचा
डोळ्यात भरणारा संथपणा, निर्जनपणा गर्दीशिवायच्या एकान्त सळसळ या चित्रांमधून विशेषत्वाने
रेखाटला आहे. न्यू पॅलेस, शालिनी पॅलेस, ब्रह्मपुरी इथला वास्तू- झाडीपट्टीचा रेखाटलेला निर्जन प्रदेश वेधक वाटतो. पंचगंगा नदीचा
घाट, संथ नागमोडी
वळण, मावळीतीच्या
सूर्यबिंबाचे पाण्यावरचे चमचमते प्रतिबिंब आणि अंगवळणीचा निवांतपणाने त्यास बहार आणला
आहे. निसर्गसान्निध्याचा
एक भाग म्हणजे त्यांच्या चित्रातील पाणी. पाण्याविषयीची अपार ओढ त्यांना असावी. या पाण्याच्या
विविध रंगसंवेदना त्यांनी रेखाटल्या. मळवलीचा ओढा, नदी पात्र, डोह, समुद्रपाणी ते सकाळच्या पाण्यापासून ते मध्यरात्रीच्या पाण्याची विलोभनीय
रंगचित्रे रेखाटली आहेत. पाढंरेशुभ्र, फिकट निळे, हिरवे, काळसर, हिरवा निळ्याची मिसळण अशी पाण्याची रंगचित्रे आहेत.
ब्रह्मपुरीतील डेरेदार गुलमोहोराची झाडे, विशाल फांद्या
एकमेकांत गच्चपण आणि हिरव्या पानांची सळसळ, सावल्यांचा प्रदेश अशी रंगचित्रे आहेत. पन्हाळ्यावरील
पिसाटीचा बुरूज हे रंगचित्रही वैशिष्ट्यपूर्ण आहे. गडद निळ्या दाट आकाशाचा रंगावकाश, झाडापानांचा गर्दपणा, त्यात गडद शेरवी- हिरवा मिसळलेला त्यांनी त्या
भावचित्रांना समग्रता आणून आहे. तसेच मध्यरात्रीचे नदीपात्र आणि चंद्र असे एक काव्यात्म चित्र आहे. चंद्रकाताच्या रंगचित्रातील निळा- हिरवा रंग मिसळण पाहिली की ´गडद गडद निळे गडद जलद भरूनि आले´
अशा दृश्यमालकाची हटकून याद येते.

Comments
Post a Comment