नव्या धूळपेरणीसाठी - वारी
वारी निमित्ताने आषाढ महिना महाराष्ट्र
पांडुरंगमय झालेला असतो. वारी हा कष्टकरी समाजाचा आनंदसोहळा. वारीची अनेक रूपे लेखक कलावंतांनी रेखाटली आहेत. ´जाता
पंढरी वाटे सुख´ या
उत्कट भावनेने ती शब्दबध्द झाली आहेत.
´सुख पाहता लोचनी / सुख झाले वो साजनी´ अशी विठ्ठलाची
नित्य
नवी रूपे अभिव्यक्त झाली आहेत. मातृपितृरूपाच्या छायेचा आदिबंध विठ्ठल रूपातून प्रकटला. या लोकभावनेचा निरंतर असा पाठलाग
आधुनिक लेखक कवींनीही केला आहे. पंढरीमहात्म्य हा लेखक कवींचा
मोठा तृष्णाबंध आहे. ही भावना जशी श्रध्दाभावनेच्या अंगाने प्रकटली.
तशीच ती विरोधभावानेही
प्रकटली आहे. आजच्या कवींनाही अभंग आणि ओवीचे कमालीचे आकर्षण आहे. माधव ज्यूलियन, बा. सी. मर्ढेकर, विंदा करंदीकर, मधुकर केचे, दिलीप पुरूषोत्तम चित्रे, अरूण कोलटकर, विलास पाटील ते इंद्रजित भालेराव यांनी पंढरीची विविध चित्रे रेखाटली आहेत. ´तुकानिर्मित सेतूवरूनी आलो ख्रिस्त चरणी´ असे
रेव्हरंड ना. वा. टिळक म्हणू शकले. 'पांगले अवघ्या वैष्णवांचे भार, ओसरला ज्वर मृदंगाचा, स्थिरावला हार, वाळली पाकळी, गुंतली फ़ासळी निर्माल्यात' कसे कधी काळीचे परंपरेबद्दलची निर्माल्यवत गुंतवणूक अरूण कोलटकरांनी व्यक्त केली.
ज्ञानेश्र्वर तुकारामासहित ´स्व´
आणि विश्र्व न्याहळण्याचे भान आल्याचे दि. पु. चित्रे व्यक्त करतात. मराठी साहित्यिकांनी विठ्ठलाच्या निमित्ताने
आपआपला काळ आणि भावसंवेदनेचे प्रकटीकरण केले आहे.
मराठी भावकवितेच्या परंपरेत अनुराधा पाटील यांनी अतिशय समृद्ध कविता लिहिली
आहे. त्यांच्या कवितेत वारकरी परंपरेच्या समृध्द खुणा आहेत. ´पंढरीयेच्या पेठे मांडियेले
पाल´ असे म्हणणाऱ्या जनाबाईशी या कवितेचे नाते आहे. डिसेंबर 2017 मध्ये त्यांचा ´कदाचित
अजूनही´ हा लक्षणीय काव्यसंग्रह प्रसिध्द झाला. या संग्रहात ´वारी´ या शीर्षकाची वैशिष्ट्यपूर्ण
कविता आहे. समकाळातील पडझडीचे व वाताहतीचे चित्र त्यामधून मांडले आहे. वारी निमित्ताने काळवंडलेला भवताल न्याहळला आहे.
´जुन्याच खड्ड्यांमध्ये, नवीन रोपं, लागतील पुन्हा, यंदाच्या पावसाळ्यात आणि साजरे
होतील, जागोजागी न पडणाऱ्या पावसाच्या तालावर´ असे उत्सवी प्रदर्शनखोर समाजाचे चित्र
उभे केले आहे. सालाबादप्रमाणे चालू राहील हा उत्सवी समारंभ मागील पानावरून पुढे. ´केली
जाईल, गाजावाजा करत, समर्थाहाती विठ्ठलाची महापूजा, लबाडीनं साकडं घालत, उमाळ्याच्या
वारकऱ्यांना, दाराबाहेर थोपवून. चांगले दिवस आता, दूर नाहीत, दिला जाईल बाईट, खोट्या
उत्साहानं, मीडियाच्या बहुजन हिताय, वाहिन्यांना´ अशी जाण व्यक्त केली आहे. धर्मभावनेतील विशुध्द आंतरिकतेचा
आता लय झाला आहे. ग्लोबल व्हिलेजच्या, बहुरंगी प्रदर्शनाची सोंग आणि देवासह सेल्फी
समाज तयार झाला आहे. तो आत्मकेंद्री आहे. यानंतर कवितेच्या दुसऱ्या भागात वास्तव जीवनातल्या
भगभगीत घटनांची केलेली नोंद तीव्र स्वरूपाची आहे. दांभिक जीवनाच्या पार्श्र्वभूमीवर
हे चित्र अधिकच शोकान्त आणि केविलवाण्या स्वरूपाचे आहे. शेतकरी आत्महत्येचा त्यास संदर्भ
आहे. पोटामागे भटकून थकून गेलेले पाय नापिक शेताच्या बंधाऱ्याला लागतील आणि दुबार पेरणीच्या
भयामुळे दाही दिशा आकसणाऱ्या स्थितीचे चित्र आहे. ´घशातल्या घशात कोरडा हुंदका दाटून
टाच लागलेल्या आयुष्याचं, न सुटणारं गणित, लटकवेल पायांना बापजाद्यांनी लावलेल्या झाडांच्या,
निष्पर्ण फांदीवर, सगळाच लिप्ताळा, दूर झटकून´ या शब्दात आत्महत्याग्रस्त प्रदेशाचा
दुःखद स्वर व्यक्त झाला आहे. कवितेच्या अखेरच्या भागात या अवस्थेची उत्तरे कविमन शोधतो
आहे. ऊनसावलीचे फ़सवे
कवडसे तळहातावर झेलत त्यांच्या तुटलेल्या नाळेशी
संवाद साधता येईल का असा प्रश्न त्याच्या मनात आहे. खचलेल्या मनाला विश्र्वास आणि उभारी
देण्याची जाणीव त्यात आहे. त्यासाठी ´कदाचित उशीर झालेला नसेल, नव्या धूळपेरणीसाठी´
असा सद्भाव व्यक्त केला आहे. ´वारी´ निमित्त भोवताल न्याहळण्याची ही अनोखी रीत. वारीची
नित्यनूतनता अशा संवाद सौहार्दासाठी निंरतर वाढत राहो.


सुंदर विवेचन
ReplyDelete