स्मरण अण्णा भाऊंच्या वाङ्मयाचे



            अण्णा भाऊ साठे यांनी बहुविध स्वरूपाची वाङ्मयनिर्मिती केली. त्यांच्या वाङ्मयनिर्मितीला अनेकविध स्वरूपाची परिमाणे आहेत. सामाजिकदृष्ट्या अण्णा भाऊंच्या वाङ्मयाचे स्मरण हे नेहमीच समाजाला प्रेरक आहे. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव सारख्या छोट्या गावात अण्णा भाऊंचा जन्म झाला. रूढ शिक्षण न झालेले मात्र अवतीभवतीच्या समाजजीवनाने व सजीव अशा लोकपरंपरेने त्याचा मनःपिंड घडला. लहानपणीच अण्णा भाऊंच्या कुटुंबाला उपजीविकेसाठी मुंबईला जवळ करावे लागले. आणि एका नव्या संघर्ष भूमीत अण्णा भाऊंचा प्रवेश झाला. मुंबईच्या वास्तव्याने त्यांच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. एका कार्यकर्ता,  लेखक, कवी म्हणून त्यांची घडण या शहराने केली.
            अण्णा भाऊंच्या समग्र लेखनात वर्गीय-जातीय भानाचा आविष्कार आहे. त्यांच्या वाङ्मयातील माणसे ही सर्वसामान्य, वंचित, कामगार, पीडित आहेत. ही पिचलेली मात्र न डगमगणारी जीवनाच्या संघर्षभूमीत सदैव उभी राहणारी. म्हणूनच प्र. क. अत्रे यांनी लढणार्‍या माणसाची कथा असे त्याचे वर्णन केले होते. मी आणि माझा पिंड मुंबईच्या कामगार वर्गाने घडवला आहे.या भूमिकेतून ते लिहित आले.
            अण्णा भाऊंच्या वाङ्मयाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या जीवनानुभवाचा प्रदेश विस्तृत आणि व्यापक होता. मुंबईच्या चिरानगरच्या झोपटपट्टीपासून वारणा खोर्‍यातील सळसळता प्रदेश त्यांच्या वाङ्मयात आहेत. अनेकविध  क्षेत्रातील माणसांचे जगणे रेखाटले. मार्क्सवादी, आंबेडकरवादी जीवनदृष्टीचा आविष्कार त्यांच्या लेखनात आहे. त्यामुळे एका बाजूला संघर्षाचा पवित्रा, प्रतिकार आणि उद्याच्या कामगार, श्रमिकांच्या सुखस्वप्नांचे जग अण्णा भाऊंनी रेखाटले. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या मनगटावर तरली आहे.किंवा जग बदल घालु नि घाव, सांगून गेले भीमरावअशा जागृत अस्मिताभानाचा कृतज्ञतासंघर्षाचा स्वर अण्णा भाऊंनी मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केलेल्या सामूहिक जागरणाला अण्णा भाऊ समकक्ष राहिले. शोषण विरूद्ध रुढीबंडांची जाण त्यांच्या कथेत आहे. तर मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारी एक निराधार म्हातारी मृत्यूपश्‍चात आपल्या तोंडात ठेवण्यासाठी पदराच्या गाठीत सोन्याचा मनी बांधून ठेवलेला तो ती बाबासाहेबांच्या पक्षाला मदत म्हणून देते. डॉ. आंबेडकरांचे निधन हे तिला दुःखाचा डोंगर कोसळल्याची जाणीव होते.
            अण्णा भाऊ वर्गीय जाणिवेचे लेखक होते. अर्थात हे वर्गसंबंध कामगार, शोषित, वंचितांच्या बाजूचे होते. त्यामुळे भांडवलदार आणि कामगार, सरंजमदार आणि मजूर-दलित अशा द्विबिंदूतून संघर्षाची चित्रे त्यांनी रेखाटली. मलबार हिल इंद्रपुरी कुबेराची वसती नि परळात राहणारे रात्रंदिवस राबतीअसे वर्गीय विषमतेचे भान अण्णा भाऊंना होते. मार्क्सवादी विचारदृष्टीचा भाग म्हणून तो आदर्शवादाच्या अंगाने चित्रित झाला. या जीवनदृष्टीने त्यांच्या कथा-कादंबर्‍या वग, शाहिरी कवितेला आकार मिळाला. महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय चळवळीतील त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाचा देखील त्यांच्या लेखनावर परिणाम झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून, महागाई आंदोलन, गिरणी कामगारांचे आंदोलनांनी त्यांच्या वर्गीय लढ्याला अधिक धारदार बनविले. किंबहुना अण्णा भाऊंच्या वगनाट्यात आणि शाहिरीत या लोकचळवळींच्या गजबजाटाचा, लढायांचा भाग अधिक आहे. स्थानिक प्रश्‍नांपासून ते आंतरराष्ट्रीय राजकीय लढ्यांचा पैस त्यांच्या वाङ्मयात आहे. आता वळू नका, रणि पळू नका, कुणि चळू नका, बिनी मारायची अजून राहिलीयाचे तीवअसमाधान त्यांच्या लेखनात होते. हा लढाऊ बाणा त्यांच्या शाहिरीत सतत आहे. श्रमजीवी जनतेविषयी अपार कळवळा सहानुभुती त्यांच्या लेखनात होती.
            अण्णा भाऊ आणि परंपराप्रेम हा देखील महत्त्वाचा भाग आहे. या भूमीचे, माणसांचे त्यांच्या लढायाचे, पराकमाचे अत्यंत उदात्त भाषेत त्यांनी वर्णने केली आहेत. अण्णा भाऊंच्या वाङ्मयातील महाराष्ट्रअभ्यासणे हा वैशिष्ट्यपूर्ण ठेवा ठरेल. त्यांच्या नायकांचे वर्णन वीरनायकअसे करता येईल. माझी मैना ही प्रेमकविता नाही तर अतिशय सर्जनशील सामूहिक आवाहनपर राजकीय कविता आहे. महाराष्ट्र एकमेळीचे आणि भूमीच्या तुटातुटीचे कल्पक प्रतीकात्म चित्र माझी मैनाया कवितेत आहे. महाराष्ट्रावरील अखंड आणि गतिशील प्रेम त्यांच्या वाङ्मयातून साकार झाले. नवमहाराष्ट्राच्या घडणीचा त्यांनी सतत पुरस्कारच केला. अण्णा भाऊंच्या लेखनात परंपरेतील अभिजन-बहुजनांच्या संघर्षाची सुस्पष्ट अशी रेषा आहे. ही अवनी आदिवाशांची, कोळी भिल्लांची, मांग रामोशांची, कैक जातीची प्राणाहुनि प्यारअशा विशाल इतिहास समाजदृष्टी त्यांच्या वाङ्मयात आहे. किंवा ही पांढर सर्वांचीच आहेया व्यापक भूमिकेच अण्णा भाऊंनी लेखन केले.
            एका बाजूला राजकीय चळवळीचे भान म्हणून त्यांचे वाङ्मय बहुप्रिय ठरले. याची कारणे अण्णा भाऊंच्या लेखनातील लोकपरंपरेतील आवाहनप्रिय लेखनतंत्राचा वापर. लावणी, पोवाडा, गण, वननाट्य, शब्दकळा आणि छक्कड ही लोकसमूहांनी साक्षात केलेल्या रूपबंधांचा कल्पक वापर अण्णा भाऊंनी केला. राजकीय लढ्याला भाषेची आवश्यकता असते. तसेच लढाईचा एक भाग म्हणून आकमणाची, आघाताची भाषा अण्णा भाऊंनी रुढ केली. एक प्रतिकाराची भाषा अण्णा भाऊंनी दिली.
             या सार्‍या राजकीय, सामाजिक भानाबरोबरच अण्णा भाऊंच्या वाङ्मयाला अङ्गाट वाचक वर्ग लाभला. त्यांच्या कादंबर्‍यांवर चित्रपट निघाले, कादंबर्‍याच्या अनेक आवृत्या प्रसिद्ध झाल्या. समूहशरणता, परंपराप्रेम, भारतीयत्वाची चौकट, आदर्शवादाची ओढ तसेच भाषेचा अलंकरणपर काव्यात्म वापर या आवाहनपरतेमुळे अण्णा भाऊंचे वाङ्मय सर्वदूर पोहचले. त्यास वाचकप्रियता लाभली.
            अण्णा भाऊंचे वाङ्मय नव्याने वाचले जावे. तसेच त्यांच्या एकंदर जीवनदृष्टीतील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक भानाबरोबर त्यांच्या रूपबंधाचा आणि महाराष्ट्रीय सांस्कृतिक जीवनाचा नव्याने अन्वयार्थ  लावता येऊ शकतो. सुजाण कार्यकर्ते तसेच वाचकांसाठी अण्णा भाऊंच्या वाङ्मयाची पुनर्भेट ही नेहमीच आश्वासक ठरेल.
                                                                                                                            रणधीर शिंदे
(दै. पुढारी : १.०८.२०१९)


Comments

Popular posts from this blog

ज्ञानव्रती प्रा. वसंत पापळकर

चंद्रकांत मांडरे यांची चित्रशैली

नव्या धूळपेरणीसाठी - वारी