आठवणीतील गो. मा. पवार सर
. ( १६.०४.२०२०) आज डॉ गो. मा. पवार सरांचा पहिला स्मृतिदिन. त्यांच्या नसण्याचे रितेपण माझ्यासह कित्येकांना अस्वस्थ करत असावे. काळ खूप वेगाने पुढे पुढे सरकत राहतो आणि लगतच्या भूतकाळातील आठवणी देखील निसटत जातात. प्रत्येकाच्या जीवनप्रवासात अशा व्यक्तींच्या सहवासाने आपल्या व्यक्तिमत्त्वाला संपन्नता लाभलेली असते. मात्र नेहमीच्या रुटीन कामाच्या घाईगर्दीमुळे या व्यक्तींच्या आठवणी धूसर होत जातात. त्यावर वर्तमानाची पुटे साचत जातात. मात्र नेणीवेत दबा धरून बसलेल्या भावसंबंधाच्या आठवणी अपराधभावाने व्याकुळ करतात. तसेच रितेपणाच्या जाणीवेने अस्वस्थही करतात.
भाषासाहित्याचे नामवंत प्राध्यापक , साक्षेपी समीक्षक आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्याचे निष्ठावान अभ्यासक अशी त्यांची ओळख.या त्यांच्या काही आठवणी, अर्थात त्या केवळ गतस्मरण स्वरूपाच्या नाहीत. सरांच्या या आठवणीतून त्यांच्या दृष्टिकोणावर व काळस्वभावावर देखील प्रकाश पडेल. 1999 साली मी सरांच्या संपर्कात आलो तेंव्हापासून गेल्या वर्षीपर्यंत निरंतर त्यांचा सहवासाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ मला झाला. या वीस वर्षातील असंख्य आठवणी मनात रुंजी घालत आहेत.99 साली महर्षी शिंदे यांच्या चरित्रग्रंथाच्या लेखनसहाय्यासाठी साठी म्हणून मी त्यांच्या संपर्कात आलो. तो त्यांच्यातील हृद्य ज्ञानसम्पन्न भावबंधाने मला नेहमीच समृद्ध केले. सोलापूर सोडल्यानंतर पुढेही दिवाळ व उन्हाळसुट्टीतही मी त्यांना नियमित लेखनसहाय्य करत. अगदी अलीकडे 2018च्या मैत्र दिवाळी अंकासाठी त्यांनी एक आत्मपर लेख लिहिला होता तो मी असेच एक दिवस सोलापूरला गेल्यानंतर लिहिला होता. (त्याआधीही डॉ विष्णू वासमकर ,डॉ सुमन बेलवलकर व डॉ विजया वाडकर यांनी सरांना असे लेखनसाह्य केले होते.)सोलापूरला जाण्यात एक जादुई खेच होती त्याचे श्रेय सरांच्या व्यक्तिमत्त्वात होते.एम ए नंतर आडवेतिडवे माझा वाचनछंद चालू होताच. परंतु 99साली मी ज्यावेळी सरांकडे लिहायला जाऊ लागलो, तेंव्हापासून माझे भाषासाहित्यविषयीचे वाचनक्षितिज अधिक विस्तारले. त्याला काहीएक शिस्त आली. सकाळी 9 वाजता आम्ही लेखन सुरू करायचो.
आमचे हे लेखन निव्वळ तांत्रिक ,रुक्ष वा कोरडे नव्हते. महर्षींच्या चरित्रपटातील क्रमशः भाग सर निवेदन करायचे. यात केवळ सांगून संपवण्याचा भाग नसायचा. तर मानवी जीवनाविषयीच्या खोलवरच्या आस्थेने ते महर्षी शिंदे यांच्या जीवनातील अनेक प्रकारच्या घडामोडी ते अधिक विस्ताराने संगोपांग सांगत. यात एक प्रकारची अनावर भावना जशी होती तसेच माझ्याही शहाणीवात भर पडावी अशी त्यांची भावना असायची.
अगदी महर्षी शिंदे तरुण विद्यार्थीदशेत लंडनला बोटीने चालले होते. त्यावेळी शिंदे यांच्या घरातील सर्व मंडळी त्यांना निरोप द्यायला आली होती. 21 सप्टेंबर1901 रोजी ‘पर्शिया’बोटीने मुंबईचा समुद्रकिनारा सोडला त्या प्रसंगी किनाऱ्यावरील उभे असणाऱ्या घरातील लोकांच्या आकृत्या धूसर होत असताना शिंदे यांच्या मनात जी कालवाकालव झाली तो प्रसंग असो तसेच त्यावेळी मुंबई युनिव्हर्सिटीच्या राजाभाई टॉवरकडे पाहून मुंबई युनिव्हर्सिटी आपल्याला जणू काही हात वर करून आशीर्वाद देत आहे अशी शिंदे यांची भावना झाली. याचे ते कालांतरण करून सजीव असे व तल्लीन होऊन वर्णन करत.असे शिंदे यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग ते अंतःकरणाच्या ओलाव्याच्या भावनेने कथन करत. पंचवीस वर्षाहून अधिक काळ मिशनरी वृत्तीने त्यांनी महर्षी शिंदे यांच्या कार्याची मिळवलेली अफाट अशी शिंदे साधनसामुग्री ,व्यासंगामुळे त्यांच्या डोळ्यापुढे 1873 ते 1944 या काळातील महर्षी जीवनाचा बहुविध स्वरूपाचा आर्केस्ट्रा सतत निनादत असायचा. त्यातली संगती ,अनव्यार्थ, महाराष्ट्र आणि भारतातल्या सामाजिक, राजकीय घडामोडी आणि शिंदे यांच्या आयुष्याचा मध्यवर्ती पट गच्चपणे त्यांच्या मनात साठवलेला होता. त्यामुळेच महर्षीं चरित्राचा इतका प्रदीर्घ आणि साक्षेपी पट वस्तुनिष्ठपणे आणि प्रगल्भ अशा भाषिक पटावर ते मांडू शकले. महाराष्ट्र समाज इतिहासाला तसेच शिंदे यांच्या कार्याला पायाभूत सामग्री पुरविण्याचे कार्य या चरित्रग्रंथाने केले आहे. या आमच्या लेखनप्रसंगी कागदावर निव्वळ अक्षरे टपटप झरत नसायची तर या शब्दघडणीच्या अवतीभवतीचा परिसर ज्या सामाजिक जीवनाने माखलेला असतो त्याविषयी अनेक गोष्टी ते मनःपूर्वक सांगायचे. सामाजिक, राजकीय जीवन, मानवी स्वभाव ,त्यातले अंतर्विरोध, गमती जमती सांगणे त्यांना भावायचे. आपला आणि आपल्या भोवतीचा पैस अधिकाधिक रुंद व्हावा तो विस्तारावा यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे या सांगण्यात त्यांना एक प्रकारचा बौद्धिक आनंद वाटे.
हे सांगणे निर्जीव नसायचे. त्यात आपल्याला जे जे माहीत आहे ते इतरांनाही सांगणे असायचे. शब्दांचे अर्थ, व्युत्पत्ती पासून ते सांस्कृतिक जीवनाविषयी माहितीचा अखंड ओघ त्यांच्या वाणीत असायचा. तथाकथित स्कॉलर मंडळींमध्ये काही प्रमाणत असणाऱ्या इतरेजणपेक्षा वेगळेपणा जपण्याचा व ज्ञान दडवून ठेवण्याचा कोणताही प्रकार त्यांच्या बोलण्यात नसे. वाङ्मयीन परंपरेत सुप्त रुपात वसत असलेल्या अभिरुचीसंघर्षाची जाण सतत त्यांच्या दृष्टीत होती. कृतक रोमँटिक तसेच वक्तृत्वपुर्ण लेखन परंपरेविषयी त्यांच्या मनात नेहमीच गौणत्वाची भावना होती. त्यामुळेच भाऊ पाध्ये ,भालचंद्र नेमाडे ,व्यंकटेश माडगूळकर, बाबुराव बागुल, चारुता सागर या लेखकांच्या गुणवत्तेबद्दल त्यांनी वेळोवेळी लिहिले. तसेच श्री. ना. पेंडसे, पु. ल. देशपांडे ,वसंत कानेटकर यांच्या मर्यादेबद्दल तसेच मध्यमवर्गीय वाचकप्रेक्षकांचे अनुनय करणाऱ्या कोत्या साहित्यकृतीची अतिशय परखड समीक्षा केली. वाङ्मयीन संस्कृतीतील प्रस्थापित लेखकवलयाचे दडपण त्यांच्या लेखनदृष्टीवर नव्हते. विनोदात्म लेखनपरंपरा हा त्यांचा एक जिव्हाळ्याचा विषय. विनोदाची थेअरी त्यांनी मराठीत पहिल्यांदाच मांडली. लीळाचरित्र, तुकाराम , चिं. वि.जोशी ,दत्तू बांदेकर, राम नगरकर या लेखनपरंपरेने मराठीतील विनोद समृद्ध केल्याची भावना त्यांच्यात होती.
त्यांचा सामाजिक वावर हा फार चैतन्यदायी असायचा. अनेक तऱ्हेची माणसे त्यांच्या मित्रपरिवारात व संपर्कात असायची. उस्फुर्त आणि मार्मिक स्वरूपाचा विनोद त्यांच्या बोलण्यात असायचा. बऱ्याच वेळा निर्व्याज तर काही वेळा बोचणारा विनोदही त्यात असे. त्यांच्या या सततच्या मिश्किल सहजस्फूर्त विनोदात्म बोलण्यामुळे वातावरण अधिक मोकळे होत असे. मानवी जीवनात व्यक्ती तसेच समूहसंबंधावर अनेक प्रकारचे ताणतणाव तसेच दाब असतात त्यामुळे अशा बोलण्यामुळे साहजिकच एक प्रकारची मोकळीकता निर्माण होते. तसेच या त्यांच्या बोलण्यात व्यक्ती, संस्था यांच्या प्रभावसंबंधाचे दडपण त्यांच्या मनावर नसे. त्यांच्या घरी माणसांचा लोभ निरंतर असे. परिचित व्यक्तींना त्यांच्या पहिल्या नावाने ते नेहमी हाक मारत, अगदी नागनाथ (कोत्तापल्ले), सदा (डुंबरे)राजन( गवस) अरुण (खोरे) यातल्या मध्यध्वनीच्या दीर्घ उच्चरणतून जवळीकतेचा प्रत्यय देत. शब्दांच्या कालावकाशच्या कमी जास्त उच्चरणामुळे भावपरता, स्वरांच्या गुंफणीतून आत्मीय सहजीवन अधिक उन्नत करता येते यावर त्यांचा विश्वास होता. नरखेड हे त्यांचे गाव ,त्यांचे बालपण तेथे गेले ,तर सोलापुरात माध्यमिक शिक्षण, पुण्यात एस पी कॉलेजमध्ये महाविद्यालयीन तसेच पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठ तर आरंभ नोकरी अमरावती शासकीय महाविद्यालय ,मग औरंगाबाद विद्यापीठ व अखेरीस दीर्घकाळ शिवाजी विद्यापिठ,कोल्हापूर येथून सेवानिवृत्त झाले. या गावांविषयी त्यांच्या मनात अपार असा प्रेमभाव होता.
गेल्या पंधरा वर्षात किती तरी वेळा आम्ही माझ्या टू व्हिलर वरून सोलापूर आणि कोल्हापूरला समारंभांना ,कार्यक्रमाना हिंडलो. अनेक थोरामोठ्यांच्या गप्पांच्या चर्चेत त्यांच्यामुळे मला सहभागी होता आले. यू. आर. अनंतमूर्ती , म. द. हातकणंगलेकर,भालचंद्र नेमाडे , छत्रपती शाहू महाराज, सुधीर रसाळ ,नागनाथ कोत्तापल्ले, अरुण खोरे यांसारख्या असंख्य वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आठवणींचा लाभ घडला. अर्थातच या गप्पात मी केवळ कानसेनच असे.
सरांना त्यांच्या पत्नी सुजाता (माई) यांच्याबद्दल फार ममत्व होते. आपल्या जीवनाला अधिक सार्थक करण्यात त्यांचा वाटा मोठा आहे याबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञता होती. एक तर महर्षी शिंदे यांची नात म्हणून त्यांना त्यांच्याबद्दल आत्मीयता होती तसेच त्यांच्या ज्ञानसाधनेला त्या निरंतर उभारी देत आल्यात याबद्दल त्यांना नेहमी धन्यता वाटे.. महर्षी शिंदे यांना मातृदेवोभव हा शब्द एकांगी वाटे. स्त्रीच्या चांगुलपणाबद्दल ते ‘स्त्रीदेवोभव’ हा शब्द वापरत. त्याप्रमाणेच सरांनी माईंबद्दल लिहिले आहे,’ स्त्रीच्या या दैवी गुणवत्तेचा अनुभव अंशरूपाने का होईना मला त्यांच्या (महर्षींच्या)नातीमुळे आला, ही माझ्या दृष्टीने केवढी भाग्याची गोष्ट’.
त्यांनी आपल्या आयुष्यात वेळोवेळी जमवलेला ग्रंथसंग्रह व कागदपत्रे थक्क करणारी आहेत. यात हजारो पत्रे, विविध प्रकारची कात्रणे पाहणे त्याचे साक्षीदार होणे हे देखील आनंददायी भाग आहे. कागदाचा कोणताही चिटोरा ते जपून ठेवत.अगदी त्यांच्या संग्रहात त्यांच्या पीएच डी प्रबंधाचा पु. ल.देशपांडे व वि. भि. कोलते यांनी परीक्षक म्हणून लिहिलेले अहवाल देखील आहेत.( त्यावेळी पीएच. डी.प्रबंध परीक्षक कसे असत याची आपल्याला कल्पना येईल.) वसंत पळशीकर , भालचंद्र नेमाडे, गो. म. कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ, सुधीर रसाळ, रा. भा. पाटणकर अशा अनेक मंडळींचा विपुल पत्रसंग्रह त्यामध्ये आहे. तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महर्षी शिंदे यांची अफाट अशी सामग्री. त्यातील बरीचशी अद्याप प्रकाशित व्हायची आहे. मुख्य म्हणजे महर्षी कुटुंबातील व्यक्तींनी महर्षींच्या भगिनी जनाबाई, मुलगा प्रतापराव, सून लक्ष्मीबाई शिंदे यांनी लिहिलेले लेखन, पत्रे या संग्रहात आहे.
काळ आणि काळाची गती खूप वेगाने बदलली आहे. त्यामुळे एकंदर ज्ञानव्यवहार आणि सामाजिक व्यवहारात कमालीचा पालट झाला आहे. त्याचा परिणाम व्यक्ती आणि समाजसंबंधावर झाला आहे.व्यक्तिगत व व्यवसायिक आकांक्षेला सहस्र फांद्या फुटल्या आहेत. सरांना या काळाची नीट अशी चाहूलकल्पना होती . पण ते यात सहभागी झाले नाहीत वा त्याविषयी असमाधानही ते कधी व्यक्त करत नसत. आपण आपल्या आयुष्यात अतिशय समृद्ध जीवन जगलो आहोत त्याचे संचित हेच आपले जीवनसंचित आहे अशी त्यांची भावना होती. आणि त्याचाच एक भाग म्हणून त्याचा आठव आणि आपले निहित कर्तव्य ही आपली ज्ञानसाधना यावर अपार निष्ठा ठेवत जगण्याचा उत्सव अधिकाधिक सुफळ करावा या कृतार्थ आणि कृतज्ञ भावनेने सर जीवन जगले. बौद्ध दर्शनात ब्रह्मविहार नावाची एक कल्पना आहे. मैत्री, करुणा, मुदिता, व उपेक्षा .मैत्री म्हणजे केवळ व्यक्तिकेंद्री न ठेवता ती व्यापक व्यक्तींच्या ठिकाणी असावी, दुःख प्रसंगी कोसळून न जाता दुःख निवारणार्थ वर्तन करणे म्हणजे करुणा, दुसऱ्याच्या सुखात आत्मसुख मानणे ही मुदिता तर आपल्याबद्दल कोणी प्रतिकूल भाव दाखवला तर त्याबद्दल मनात राग न ठेवता त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे उपेक्षा. हे सरांनी दत्ता गायकवाड यांच्याबद्दल म्हटले होते ते तंतोतंत सरांच्या बाबतीतही लागू पडते. महर्षी विठ्ठल रामजी यांच्या जीवनदृष्टीचा त्यांच्यावर खोलवरचा प्रभाव होता. वरकरणी फटकळ व स्पष्टवक्ते असणाऱ्या सरांच्या मनात मात्र ‘कोणाही जीवाचा न घडो मत्सर ‘ असा भाव होता आणि या भावनने ते आपले जीवन जगत आले.
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
१६.०४.२०२०




Comments
Post a Comment