गोयां तुज्या मोगाखातीर

पुस्तके आवरत असताना अचानक एक वेगळा कवितासंग्रहात हाताशी आला. संग्रहाच्या प्रकाशनाच्या तपशिलाच्या ठिकाणी  वेगळे शब्द पाहायला मिळाले. आणि कुतूहल अधिक चाळवले. त्यात किंमतीसाठी 'मोल', मुद्रणासाठी 'छापपी', मुखपृष्ठासाठी 'मुखचित्र', पहिल्या आवृत्तीसाठी 'पयली खेप', प्रकाशनासाठी 'उजवाडावनी' या शब्दाने खिळवून ठेवले आणि कानामनात कोकणी भाषेचा नाद गुंजत राहिला. निमित्त माधव बोरकर यांचा 'अव्यक्ताची गाणी'हा कोकणी भाषेतील कवितासंग्रह. साठेक पानांच्या या कवितासंग्रहातील कोकणी भाषेने जिज्ञासा अधिक वाढवली, त्याआधी कोकणी भाषेचे नाद मनात साठलेले होतेच. त्याला या कवितारूपाने हलकासा आवाज प्रतिसाद मिळाला.  साहित्याच्या अंगणामध्ये भाषासंस्कृती, भूगोलाची बंधनं नसतात याची जणू झलक या कविता भाषेने अधिक दुणावली. यापूर्वीही गोव्यातील कोकणी भाषेचे लहजे, सुरावटी, आकारांत आणि ओकारान्त, 'ना'कारान्त (नासिक्य उच्चारांची) भाषारूपांची वेगळी गंमत वाटायची. या नाद भाषेने स्वाभाविकच त्याकडे ओढला गेलो. बोरकारांच्या काव्यसंवेदन स्वभावाचा एक वेगळा प्रत्यय आहे.  रोमँटिक संवेदनशीलता, गूढतेचा शोध, 'स्व'शोधाची आंतरिकता, प्रीतभावना, निसर्ग शोध ही त्यांच्या कवितेची वैशिष्टये. अतिशय अल्पाक्षरी, संक्षेपी मितव्ययी स्वरूपाची ही कविता आहे. दोन ओळींच्या रचनेपासून ते सात आठ ओळींचा रचना पसारा हे तिचे वेगळेपण आहे. मुख्यत्वे प्रीतभावना ते  निसर्गाविषयीची आनंदमयता साकार करणारी कविता आहे.या प्रकारचे लेखन वाचले म्हणजे कोकणी भाषा आणि साहित्य  आणि मराठी संस्कृती यांच्यातील अनुबंध मनात जागे होतात. या दृष्टीने मराठी आणि गोवा-कोकण संस्कृती, विचारदृष्टी, वाङ्मयरूपे याचा आंतरसंहितात्मक विचार महत्त्वाचा ठरू शकतो. अशा शक्यता या उभयसंस्कृतीत पहायला मिळतात. मराठी संस्कृती आणि भाषेतील अनुबंधाच्या विपुल खुणा कोकणी भाषा साहित्यात पहायला मिळतात.

या संग्रहानिमित्ताने बोरकरांची  वेगळी आठवण झाली. २००७ साली  शिवाजी विद्यापीठातील दीक्षांत ग्रंथ महोत्सवात पुस्तकांच्या स्टॉलवर व नंतर कवी संमेलनात  माधव बोरकर यांची भेट झाल्याचे आठवते. (वेणूमाधव बोरकार असे त्यांचे भारदस्त नाव आहे.). बोरकर हे विलक्षण कलासंपन्न आणि वाङ्मयप्रेमी व्यक्तिमत्व आहे. साहित्य, कला, संगीत, नाटक, चित्रकला याविषयी विलक्षण कुतूहल व्यासंग त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे. मराठी वाङ्मय संस्कृतीविषयी त्यांच्या मनात मोठा आदरभाव आहे. मराठी वाङ्मयाचे त्यांचे अफाट असे वाचन आहे. या वाचन प्रेमापोटी नवीन काही वाचले किंवा माझा एखादा लेख आवडला की, ते आवर्जून फोन करतात. मुख्य म्हणजे आधुनिक मराठी काव्यपरंपरेविषयी त्यांच्या मनात खूप आस्थाभाव आहे. तसेच दिलीप चित्रे यांच्या कवितेविषयी त्यांना फार ममत्व वाटते. मंगळूर, मुंबई, पुणेकोल्हापूर, पणजी येथे त्यांनी आकाशवाणी केंद्रावर सहसंचालक, संचालक, कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केले. मराठीतील बहुतांश वाङ्मय नियतकालिके, दिवाळी अंक, नवीन पुस्तके हे त्यांच्या हाताशी असतात. पंधरा वर्षांपूर्वी कोल्हापुरात ते एक-दोन वर्ष  असावेत. त्यावेळेस त्यांनी कोल्हापूर आकाशवाणी केंद्राच्या स्टाफ क्वार्टर मध्ये गप्पा मारायला बोलावले होते. एकटेच होते. त्याच्या खुणा घरभर होत्या. हॉलमध्ये आम्ही गप्पा मारत बसलो होतो. त्यांच्या टिपॉय खाली 'नवअनुष्टुभ', 'खेळ' सारखी मराठीतील अनेक नियतकालिके आणि मराठी पुस्तके विसावलेली  होती. आधुनिक मराठी साहित्य विषयीचे कुतूहल आणि त्याविषयीची त्यांचा व्यासंग चांगला आहे. विविध प्रकारचे वाङ्मय निरंतर जाणून घेणे त्यांना महत्त्वाचे वाटते

 त्यांच्या चेहऱ्यावर  अबोलमौन कायम विलसत असतेआवडीच्या विषयावर बोलणे निघाले की त्यांच्या आविष्काराला बहर येतो. त्यांच्या देहबोलीतून कमालीचे सुजनत्व विलसत राहते.  बोलण्याची विशिष्ट पद्धती, आवाज आणि शब्द आवृत्त करण्याच्या विशिष्ट पद्धती बरोबरच मधूनच कोकणी शब्द आणि नाद झरत असतात. फोनवरूनही साहित्या विषयीचे बारकावे, भाषेचे कंगोरे, लेखक- कवींच्या आठवणींची उत्कटपणानं भागीदारी  करतात.  शंकर रामाणी, नरेश कवडीम. वा. धोंड यांच्या अनेकांच्या आठवणी ते मोठ्या जिव्हाळ्याने सांगतात.

इंग्रजी भाषासाहित्यात एम. ए. झालेल्या बोरकर यांची कोकणी भाषेतील महत्त्वाचे कवी म्हणून गणना होते. त्यांचे जवळपास आठ कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या यमन संग्राहास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, याबरोबर त्यांनी कबीर आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्यकृतीचा कोकणीत अनुवाद केला आहे. लहानपणी त्यांनी  पहिली कविता कोणत्या दिवशी लिहिली  ती तारीख देखील त्यांच्या स्मरणात आहे. लहानपणापासून त्यांना संगीताची, गाण्यांची  विलक्षण आवड होती. मुंबईच्या वास्तव्यकाळात त्यांच्या सांगितिक गानछंदाला अधिक वाव मिळाला. या काळात 'कानार पडलें ते गोड लागलें' असे त्यांनी  म्हटले आहे. शास्त्रीय संगीत 'आयकुपाचीगोडी लागली. आणि या संगीतातील 'सोद घेत घेत कवितेकडेचं हांव सगळ्यांत निर्माण पावलें' असा आपला कवित्व शोध त्यांनी सांगितला आहे. '  कुठे बुडाला पलिकडे तो सोन्याचा गोळा' या भा.रा. तांबे यांच्या कवितेने त्यांच्या मनावर विलक्षण परिणाम केला. ही कविता मनावर कोरिल्ली' (कोरली) असे त्यांनी नोंदवले आहे. शंकर रामाणी यांच्या सहवासामुळे त्यांच्या काव्यप्रतिभेला बहर आला. कवी अनिल, ना.घ. देशपांडे, आरती प्रभूपु.शि. रेगे, दि. पु. चित्रे, ना. धों महानोर, ग्रेस यांच्या कवितेने त्यांना प्रभावित केले आहे. 'सत्यकथा' नियतकालिकाचा त्यांच्या लेखनावर प्रभाव आहे. 'म्हाका कवितेकडेन पळोवचेली नदर दिली' असे त्यांनी 'सत्यकथे' बद्दल म्हटले आहे. आकाशवाणीवर कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांच्यातील सांगितिक जीवनाला अधिक मोठा अवकाश मिळाला. मंगरूळ मधील वास्तव्यकाळात त्यांच्यात भारतीय संगीत तसेच कर्नाटकी संगीताबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. 'बांदून काडिल्ल्या पाटांतल्यानं झुळझुळत उदक व्हांवता तशे' संगीताच्या सुरावटीची आवड त्यांच्या कवितेमध्ये आपसूक भारीत झाली. त्याचबरोबर आपल्या जीवनातील  प्रवासकाळाने देखील त्यांच्या  निर्मितीला वेगळे रूप प्राप्त करून दिले. 'कवितेची कुळकथा सांगणं हे सोपे नाही' असे त्यांना वाटते.  येट्स, एलिएट, ऑडन या  पाश्चात्त्य कवींबरोबर मराठी तसेच भारतीय कवितेचा त्यांच्यावर मोठा प्रभाव झालेला आहे.

मला स्वतःला त्या कवितेच्या आशयसूत्रबद्दल, जीवनदृष्टी बद्दल फार सखोल काही सांगता येणार नाही. परंतु कोकणी भाषेच्या सुरावटी, ध्वनिपसाऱ्यामुळेही कविता वेगळी वाटली. 'सत्यकथा' तसेच मराठीतील रोमॅण्टिक काव्यपरंपरेच्या  खुणा त्यांच्या कवितेवर आहेतप्रीतभावनेची विविध रूपे, निसर्ग प्रीतीची साधना आणि अल्पाक्षरी  नादमंत्रित करणाऱ्या शब्दकळेने या कवितेस वेगळे परिमाण प्राप्त करून दिले आहेकाही कविता या केवळ दोन ओळींच्या आहेतप्रीत व निसर्गसंवेदनेची सूक्ष्मता या कवितेतून साकार झाली आहे. प्रीतभावनेतील उत्कट आठव रूपे , तिच्या शोधाच्या वाटा, देहानुभवाची रूपे या कवितेत आहेतगूढता आणि आधिभौतिकाचा स्वर या कवितेत आहे. ऋतुचक्र आणि गोव्यातील निसर्गाची विलोभनीय रूपे या कवितेत आहेत. निसर्गाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी त्यांच्या कवितेमध्ये आहे. 'सांज जाता / दोंगरां पल्तडच्या गावांत / दिसाच्या निमाण्या किर्णात' किंवा 'सुरंगांचो वळेसर / तशे हे दीस / घमघमतात /  तुजे यादींनी अशा प्रकारची प्रीत भावनेतील उत्कट आठवरूपे या कवितेत रेखाटली आहेत. ' दिव्यान / पेटटा दिवो/तशी कवितेन कविता'  असा कविता निर्मिती अनुभव  आहे. 'नक्षत्रांनी  तुझ्या दोळ्यांचे आंगण/  मागल्यार तांकां तू खेळूंक दिशीत'  या प्रकारच्या असंख्य प्रतिमावैभव या कवितेत आहे. किंवा 'पांचवो शेताचो चौकोन / तुझे चोळयेचो खण' अशी  विलक्षण प्रतिमा रूपे या कवितेत आहेत. संग्रहाच्या प्रास्ताविकात त्यांनी म्हटले आहे,' झाडांचे वेगवेगळे आकार, मळवांल्या कुपांच्यो आकृताचो, अस्तंतेच्या  मळबावयले भिऱ्याचे  आरोह-अवरोह,  सैमाची रुद्र आनी सौम्य रूपां तशेच रुतूंचे रंग, मनशां मनशां मदल्या नात्याचे नाजूक धागे आनी तांचे अर्थ या सगल्यांत म्हाका कवितेचो आशय दिसता' या दृष्टीने त्यांची कविता समजून घ्याला हवी.  भारतीय संस्कृतीमध्ये भाषा साहित्याच्या  अनंत धारा वाहात आहेत, त्या जाणून घेणं हा एक विलक्षण नादानुभव आहे. गोवा हे केवळ तीर्थाटनाच्या मौजेची राजधानी नाही तर संस्कृती, भाषा, मानवी जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी या प्रकारच्या साहित्य वाचनातून येऊ शकते. म्हणून मनोहरराय सरदेसाई यांच्या ओळीतून, गोयां तुज्या  मोगाखातीर. (प्रेमाखातीर)

                                                                                                                                                           रणधीर शिंदे.

Comments

  1. खूप मायेमोगानं तुयेन हे बरयल्ले आशिल्ले रे, रणधीर! खूप आवडले!

    ReplyDelete
  2. छान ओळख करून दिलीय रणधीर...

    ReplyDelete
  3. आभार मनापासून

    ReplyDelete
  4. मर्मग्राही👌

    ReplyDelete
  5. दोघेही गुणसंपन्न साहित्यिक आहेत। उभयतांना मी अगदी व्यक्तिगतरित्या ओळखतो। दोघेही व्यासपीठावर उपस्थित होताच, हातात लिहिलेले कागद न घेता स्वत:च्या अभ्यासक्षेत्रातील विषयावर आधारलेले संदर्भविपुल, व्यासंगपूर्ण, नाविन्यपूर्ण तसेच विचारप्रवर्तक स्वरूपाचे व्याख्यान देऊ शकतात।

    ReplyDelete
  6. छान, वेगळी माहिती मिळाली...

    ReplyDelete
  7. सर, तुमच्या समिक्षेंतल्यान माधवबाबाचें सोबीत चित्र आकाराक आयलां. म्हज्या काव्यझेल्याच्या उक्तावण सुवळ्याक सर आयिल्ले ताची याद ह्या खिणाक आयली. मनशाक पळोवपाची नदर कितली खोल आसूं शकता ताचो दिश्टावो म्हाका तुमच्या उतरांनी जालो. माधवबाब कवितेकडेन एका वेगळ्या नदरेन पळयतात. तांची ती 'जाग' ह्या मासिकांतल्यान वाचप्यां मेरेन पावता. पूण तुमी माधवबाबाचें वेगळें रूप तुमच्या लेखांतल्यान शब्दबध्द केलां. तुमची गिरेस्त शब्दसंपदा तातूंतल्यान पळोवपाक मेळटा. तुमकां वालोर..!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ज्ञानव्रती प्रा. वसंत पापळकर

चंद्रकांत मांडरे यांची चित्रशैली

नव्या धूळपेरणीसाठी - वारी