ज्ञानव्रती प्रा. वसंत पापळकर


(३१.०३.२०१९)
 तत्त्वज्ञानाचे व्यासंगी अभ्यासक प्रा. वसंत पापळकर यांचे वयाच्या 85 व्या वर्षी बार्शी येथे दुःखद निधन झाले. त्यांचा जन्म व शिक्षण विदर्भात झाले. त्यानंतर नोकरी निमित्ताने त्यांचे कायमचे बार्शीत वास्तव्य घडले. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ शिवाजी महाविद्यालयात काम केले. विद्यार्थिप्रेमी शिक्षक म्हणून शैक्षणिक क्षेत्रांत त्यांच्याकडे नेहमीच आदरभावाने पाहिले गेले.  विज्ञानातील तत्त्वज्ञान हा त्यांचा विशेष अभ्यासाचा प्रांत होता. भारतीय दर्शनांचा त्यांनी नवा अर्थ लावला. शंकराचार्य, वेदांत, न्यूटन ते आइन्स्टाइन ही त्यांची शोधयात्रेच्या विसाव्याची केंद्रे होती. त्यांनी मराठी संतपरंपरेचा कालोचित अर्थ लावला.

               अध्यापनाबरोबर  संस्थात्मक पातळीवर देखील त्यांनी काम केले. बार्शीच्या सार्वजनिक ग्रंथालयाचे ते बरीच वर्षे अध्यक्ष होते. बार्शी येथे संपन्न झालेल्या 54 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. एवढेच नव्हेतर या संमेलनात ' कविता- असणे व होणे ' या त्यांच्या निबंधावर स्वतंत्र चर्चा संमेलनात ठेवली होती. शिवाजी विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान अभ्यास मंडळावर त्यांनी काम केले, 1972  साली त्यांचा "दरबार" हा कवितासंग्रह नारायण सुर्वे यांच्या हस्ते प्रकाशित झाला. मराठी साहित्य मंडळ बार्शी व सार्वजनिक ग्रंथालयाच्यावतीने त्यांनी अनेक वाङ्‌मयीन उपक्रम घडविले. राज्यभर प्रसिद्ध ठरलेली "पाणिनी" वक्तृत्व त्यांच्याच पुढाकाराने सुरू झाली. पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभागाच्या वतीने प्रसिद्ध होणाऱ्या 'परामर्ष'मधून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले तेच पुढे 'लोकसत्ता' मधूनही प्रसिद्ध झाले.

           "कविता असणे व होणे" या निबंधातून त्यांनी कविता निर्मितीचा व वाचकपक्ष्यी तिच्या पुननिर्मितीबद्दल विचार मांडला. कवितेची सत्ता, अर्थाचे अधिकचे दर्शन, कविता संहितेचा अनाग्रहीपणा, शब्द संहितेला फुटणाऱ्या फांद्या  आणि वाचकांच्या अर्थस्वातंत्र्याचा विषय त्यांनी या निबंधात मांडला.
                     "दरबार" या संग्रहातील त्यांची कविता  आधुनिकतावादाचा व रोमॅटिसिझमच्या संस्कार मुशीतून  निर्माण झाली. अस्तित्वानुभवाचे विविध पदर त्यांच्या कवितेतून प्रकटले आहेत. स्वतःला छिलून घेणाऱ्या मानवी रणसंग्रमातील अटतटीच्या प्रसंगानी ती साक्षात झाली आहे. यादृष्टीने मानव, निसर्ग आणि पशूपक्षांच्या चल सृष्टीने तिला वेगळा परिमाण प्राप्त झाले आहे. काळोख वाटेवरची असाहाय्य भ्रमंतीरूपकाचा विस्तार त्यामध्ये आहे. मोडलेली दुभंग स्वप्नसृष्टी  उपरोधभावाने व्यक्त झाली आहे. तसेच त्यांच्या कवितेत मरणानुभवाची गडद सावली आहे. मृत्यूनंतरही काही उरेल या कडे जे चिंतनभूमीवरून पाहत.  एका कवितेत त्यांनी म्हटले आहे,
                           चितेभोवती घिरटत असतो
                           न मरणारा एक पक्षी
                           सगळे गेल्यावर उरते
                          राखेवर त्याच्या पायाची नक्षी
                          सर्वसाक्षी
           याप्रकारच्या संवेदनेने विनटलेली कविता त्यांनी लिहीली. गोठीव शब्दकळा, "कावळ्याच्या बुबळाला कचकड्यांचा मोठा नाद " या प्रकारचे गुंतागुंतीचे चमचमते प्रतिमाविश्व, चिंतनशीलता आणि अल्पाक्षरत्व ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत.  या संग्रहातील त्यांची "मृत्यूपत्र" नावाची चार ओळींची कविता आहे. त्यातील ओळी अशा आहेत. " आम्ही उद्या नसू पण आमचे नाव , लिहायला धूळ, धूळीवर बोटे असोत " असे जीवनाच्या वाहतेपणाविषयी आस बाळगणारी कविता त्यांनी लिहिली. तत्त्वज्ञान, वाङ्‌मय, ग्रंथादि क्षेत्रांत रममाण असणारा आणि ज्ञाननिष्ठतेचे दुर्मीळ उदाहरण असणाऱ्या प्रा. पापळकरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
                                                                                                 
                            
 2006-07 च्या सुमारास मी त्यांना भीतभीत भेटल्याचे आठवते. तेही कुतुहलापोटी.. पहिल्याच भेटीत खूप गप्पा झाल्या. पुस्तकांविषयी, अभ्यासविषयी आणि मग दर दिवाळ आणि उन्हाळसुट्टीत कायमचे मी त्यांच्याकडे जाऊ लागलो. 'माझी मज होते अनावर वाचा' या अखंड उर्जेने ते बोलत. परतताना मनात कृतार्थ चलउर्जा देहामनात पसरलेली असायची . जुना काळ, शिक्षक, ज्ञानपरंपरा अशा स्मृतीना उजाळा द्यायचे. दिलीप चित्रे यांच्या कवितेवर मी अभ्यास करत असल्याचे त्यांना आनंद वाटला होता. वाङ्‌मयबद्दल, तत्त्वज्ञानाबद्दल सतत प्रश्न विचारायचे. विचारांना मुक्तभूमी देऊन विचारप्रवृत्त करायचे.

            चित्रे कवितेची चर्चा करताना संतवाङ्‌मयाच्या अनुबंधाचा विषय निघाला. मी चित्रे, ज्ञानेश्वर व काश्मिरी शैवपरंपरेबद्दल बोललो तर ते म्हणाले, 'चित्रे यांची ही वाट ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथामार्गे अभिनवगुप्ताला जाऊन मिळालेली आहे. "तियेविण गोसावी असणाऱ्या" शिवशक्तीच्या मनोमिलाफाच्या महारूपकासंबंधी अतिशय प्रगल्भ चर्चा केल्याचे अजूनही आठवते. विरळ पांढरे केस, जाड चष्मा, अंगावर स्वच्छ सदरा, शब्दोच्चार सुस्पष्ट खणखणीत आवाज आणि वाणीविलासातली अपूर्वता आजमावणाऱ्या देहबोलीने त्यांच्या चेहऱ्यावर चैतन्यप्रभा विलसत असे.  बोलण्यातून शब्दांच्या लडी अनावरपणे निनादत रहायच्या. त्यांना ऐकायली कमी यायचे, मोठ्याने बोलावे लगायचे. कानात श्रवणयंत्र बसविलेले. शब्दांवर ट्रेस देऊन बोलल्यामुळे त्यांना त्रास व्हायचा.  प्लेटो, कांट, काफ्का, हेमिंग्वे, देकार्त, बर्गसाँ , स्टाइनबेक, शंकराचार्य, उपनिषदे, चार्वाक अशा तत्त्ववेत्यांच्या वाटेबद्दल त्यांच्या मनात ममत्व होते. त्यांनी सांगितलेल्या या प्रसंगी दोन आठवणी स्मरतात.

1. अभ्यास मंडळाच्या बैठकीसाठी ते बार्शीहून नॅरोगेज रेल्वेने मिरज मार्गे कोल्हापूरला यायचे. एकदा मिरज रेल्वे स्टेशनवर नारायण सुर्वे त्यांना भेटले. स्टेशनवरील गर्दीतून सुर्वे यांनी वसंतराव अशी हाक मारून थांबवले व मीही अभ्यास मंडळ बैठकीसाठी चाललो आहे असे म्हणाले.  आणि मग दोघेही गप्पा मारत कोल्हापूर पर्यंत केलेल्या प्रवासाबदद्ल त्यांना समाधान वाटे. (त्यावेळी अभ्यास मंडळावर नारायण सुर्वे सारखी मंडळी सदस्य असायची.)
2. दुसरी आठवण ही अशीच ह्रद्य आहे. 1972 साली त्यांच्या 'दरबार' या कवितासंग्रहाच्या प्रकाशनासाठी बार्शीत नारायण सुर्वे आले होते. एका छोट्या  हॉलमध्ये संग्रहाचे प्रकाशन झाले. सबंध कार्यक्रम चालू असताना आडतीवरील एक हमाल हॉलच्या दरवाजाच्या एका कोपऱ्यात उभा राहून समारंभ ऐकत होता. समारंभ  संपल्यानंतर सुर्वे आणि संयोजक मुक्कामाच्या ठिकाणाकडे चालले होते. आपल्या पाठोपाठ तो हमाल येत आहे हे सुर्वे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी थांबून त्याला विचारले, 'तुम्ही आमच्या मागे का येत आहात.' तर तो केविलवाण्या नजरेने म्हणाला माझी एक इच्छा की, 'तुमच्या हातात जी छोटी ब्रिफकेस आहे ती घेऊन मला तुमच्या निवासापर्यंत यायचे आहे.  एखाद्या सामान्य माणसाला देखील सुर्व्यांविषयी एवढे प्रेम वाटते याचे त्यांना अप्रुप वाटे.

                 नागपूर साहित्य संमेलनातील अरुण साधू यांच्या भाषणावर त्यांनी फार मौलिक टिपण लिहिले होते. कादंबरीकाराच्या जिज्ञासाशोधाची सूत्रे त्यांनी मांडली होती. तत्त्वज्ञान आणि कादंबरीसंबधी यात नवा विचार होता. साधूंच्या काही प्रतिपादनाबद्दल विरोध दर्शवून तत्त्वज्ञानाची मातब्बरी सांगितली होती. तत्त्वज्ञानाचा निखारा कादंबरीकाराला पकडता येईलच असे नव्हे. असे त्यांचे म्हणणे होते. तसेच वाङ्‌मय प्रकाराच्या श्रेणीव्यवस्थेचे सामर्थ्य,मर्यादा व प्रकाराच्या आद्यत्वाबद्दलही चिंतनशील मुद्दे त्यांनी मांडले. मराठी साहित्याच्या खुजेपणाची व कोत्या अनुभवविश्र्वाबद्द्ल त्यांना खंत वाटे. महादेव मोरे यांच्या सारख्या लेखकाने मराठी साहित्यात आणलेल्या अफाट जगाबद्दल त्यांना कुतूहल वाटत होते. हायवे रस्त्यावरील हिडीसफिडिस ठरवलेले अनाम लोकांच्या जगाबद्द्ल लेखकाने  संवेदनेबददल त्यांना आस्था  होती.

                तत्त्वज्ञान व वाङ्‌मयविषयी अपार कुतूहल त्यांच्या मनात होते. जोडीला प्रचंड वाचनसंगत. शिवाजी विद्यापीठाविषयी त्यांच्या मनात ममत्व होते. खूप खूप काम करा असे मला म्हणत. प्रश्न उपस्थित करणे आणि त्याच्या अनेकदेशी विचारांना मुक्तावकाश मिळवून देत. त्यात तार्किकता, कार्यकारणसंबंध, पूर्वपक्ष, उत्तरपक्ष आणि उलगडा असे. आज तत्त्वज्ञान विषय तर अडगळीतच गेला आहे. तसेच सगळ्यांच्याच डोळ्यांवर अड्राँइड स्क्रीनची मोहक सूजभूल आहे. त्यामुळे ज्ञानवंतांबद्दल ना ओरखडा ना संवेदना.
                                                                                                                       रणधीर शिंदे ३१.०३.२०१९

Comments

  1. माझ्या सासऱ्यांना डॉ. रणधीर शिंदे सर यांच्या सारखे मि‌‌त्र लाभले.
    त्यांच्या ह्या blog मध्ये मागील काही दशकांतील निवडक क्षण त्यांनी संवेदनशीलतेने उलगडले आहेत व ज्ञानाचा प्रवास सुरेख रीतीने ओवला आहे.
    आम्ही सर्व जण चाललेल्या चर्चा आतल्या खोलीत बसून ऐकत असू. त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
    डाॅ. शिंदे सर यांचे थोर कवी दिलीप चित्रे, कोल्हापूरचे समाजकारण व इतरही अनेक विषयांवर ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. रिंगाण कादंबरीवरील त्यांची समीक्षाच अंगावर शहारे आणणारी आहे.
    सर आज शिवाजी विद्यापीठामध्ये ज्ञानाची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य करीत आहेत. त्यांना सादर प्रणाम!

    -सौ. सुर्पणा नचिकेत पापळकर.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार मनापासून. सरांसारख्या ज्ञानवृत्ती असणाऱ्या व्यक्ती आज दुर्मीळ. म्हणून हे स्मरण औचित्यपूर्ण.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

चंद्रकांत मांडरे यांची चित्रशैली

नव्या धूळपेरणीसाठी - वारी