आठवणी किर्लोस्करवाडीच्या

   
1999  ते 2005 या काळात मी कुंडल (जि. सांगली) येथे जी. डी. बापू लाड महाविद्यालयात मी प्राध्यापक होतो. यातील तीन साडेतीन  वर्षे  सावंतपूर वसाहतीतील  मनोहर ग्रामोपाध्ये यांच्या घरी वरच्या मजल्यावर रहात असे. अवतीभवतीचा परिसर गर्द झाडांचा. आंबा, रामफळ, चाफा, गुलामोहराची झाडे आणि थोड्या अंतरावर ऊसमळे लगत परिसरात होते. निरंतर शांतता असणारा तो परिसर. तो काळ बहुधा कंपनीचा  मंदीकाळ असावा असे लोकांच्या बोलण्यावरून जाणवायाचे. परिसरातील नोकरदारांचा ओढा  पुण्याकडे जाण्याकडे  होता.

           कुंडल आणि किर्लोस्करवाडीचा परिसर  हिरव्यागार शेतीने बहरलेला. समृद्ध आणि संपन्न भूमीप्रदेश. या परिसराच्या मनात गोठवलेल्या आठवणी पुनःपुन्हा खेचून घेतात.  नोकरीचा हा आरंभकाळ होता. विद्यार्थीदशेचा काळ संपून  जगण्याच्या प्रत्यक्ष व्यवहारात प्रवेशित झालो होतो. एका नव्या मुलखात, अनोळखी माणसांच्या जगात दाखल झालो होतो. बरोबर   नव्यानेच नोकरीस रुजू झालेली आम्ही काही (बॅचलर) प्राध्यापक  मंडळी होती. पगारही जेमतेम. मात्र खर्चाला वाटा नव्हत्या., त्यामुळे काळ सुसह्य वाटे. 
         या परिसरात खूप भटकंती झाली.  या परिसराविषयी आत्मीय भाव वसलेला आहे. किर्लोस्करवाडीत राहायला आल्यानंतर आणि त्याही आधी किर्लोस्करवाडी कंपनीचा परिसर मनाला भुरळ घाले.  कंपनी  परिसरातील  मायाप्पा मंदिर, गणपती मंदिर,शाळा, क्रिकेटचे खेळमैदान, सभागृह, अत्यंत सुबक अशी रस्त्यांची, झाडांची, वास्तूंच्या  ठेवणीमुळे संध्याकाळी फिरायला आल्हाददायक वाटे. मावळतीक्षणकाळात मंद वाऱ्याच्या झुळकी मनातल्या चिंतेला विराम द्यायच्या. मायप्पा मंदिरातील वातावरण आदिम वातावरणाची आठवण करून द्यायचे. भलेमोठे पुराणपुरुष वृक्ष, झाडांच्या नजिक फांदीवर मोठाले देवाचे तुरेबाज कोंबडे डोळे मिटून संध्याकाळच्या वेळी बसलेले दिसत. ओबडधोबड दगड,  घंटाचे तरंगणारे निनादध्वनी, इवल्या दरवाजतून देहाचा मुटका करून शेंदरी भगव्या दगडी मूर्तीसमोचा गाभाऱ्यातली नि:स्तब्ध शान्तता, ढोलांचे आवाज. कधी पिवळ्याधम्म भंडाऱ्याची उधळण,  यामुळे एका अद्भुताच्या  आदिप्रवासात आहोत असं वाटायचं.  कंपनीच्या उंच वास्तू ,आवाज, गजबज आधुनिक पार्श्वभूमीवर  मंदीर गुपचूप लपून बसलेले वाटे. कधी काळी मानव समूहाने त्याच्या जगण्याच्या श्रध्दाविष्काराचे घंटानिनाद आजही घुमत असल्याचा भास व्ह्यायचा. 

        सुट्टीच्या दिवशी पलूस, कुंडल, ताकारी, सागरेश्वर, पुंणदी   परिसरात भटकत रहायचो. वा औदुंबर नदीकाठचा रम्य परिसराची भूल असायची. किर्लोस्करवाडीच्या औद्योगिक आणि सांस्कृतिक  कामगिरीबद्दल मनामध्ये आस्था होती. एका बाजूला नागरी जीवनाच्या विपुल खाणाखुणा  किर्लोस्करवाडीच्या अंगाखांद्यावर आहेत. तर दुसऱ्या बाजूला शेतकरी, शेतमजूर, कामगारांचे सजीव असे जग.   तसेच अन्य जिल्ह्यातून वा कर्नाटकातून पोटासाठी आलेल्या माणसांची गर्दी दिसायची. अगदी रेल्वे स्टेशनच्या कडेला पालावरील भटके लोक ते कृष्णा काठावरून छोटे-मोठे मासे पकडून विकायला येणारे भोई दिसायचे.  रामानंदनगरच्या छोट्या आठवडी बाजारांतील  गजबजलेला माहोल आणि ताज्या भाज्यांचा व मेवामिठाईचा घमघमाट वाऱ्यावर विहरत असायचा.  रेल्वे फाटका जवळ सकाळच्या वेळी वाफाळलेला चहा अशा अनेक किर्लोस्करवाडीच्या रम्य आठवणी मनात  कायम विसाव्याला आहेत.  एका छोट्या औद्योगिक गावामध्ये रेल्वे थांबा हा दळणवळणाचा,संपर्काचा  महत्त्वाचा थांबा म्हणून किर्लोस्करवाडी नावारूपाला आली. दिवसातून खूप कमी रेल्वे या थांब्यावर थांबत असतील. पंचक्रोशीतील अनेक माणसांचे संपर्कमाध्यम म्हणून हे  स्टेशन नावारूपाला आले. त्याचबरोबर किर्लोस्करवाडीतील एक महत्त्वाची बाब म्हणजे वाङ्मय,कला-संस्कृतीच्या बाबतीत  कम्पनी व तेथील परिसरला खूप महत्त्व आहे.  आज ते काही प्रमाणत लुप्त झालेले दिसेल. किर्लोस्कर कुटुंबीयांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरी विषयी कोणालाही आस्था वाटणे स्वाभाविक आहे. जुनी मराठी नाटके तिथे होत असत. 'किर्लोस्कर', 'स्त्री' व 'मनोहर' सारखी  मासिके तेथून प्रसिद्ध होत. किर्लोस्कर कुटुंब तेथील सामाजिक जीवनामध्ये मिसळून गेले होते. अनेक साहित्यिक तिथे यायचे.  ना. ह. आपटे आणि ना. धों. ताम्हणकर किर्लोस्कर मासिकाचे संपादक होते. एकाच वेळी वि. दा. सावरकर, र. धों. कर्वे, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, चिं. वि. जोशी, यासारखी  लेखक मंडळी किर्लोस्कर मधून लिहीत.  साहित्यिक मेळावे आयोजित केले जात.  बैलगाडीतून सागरेश्वराच्या उंच डोंगरावर शिदोरी घेऊन वर्षासहली काढल्या जात  . यात कधीमधी खांडेकर ,ना. सी फडके सारखी मंडळीही सहभागी होत. कर्मवीर भाऊराव पाटील काही काळ  किर्लोस्कर कंपनीत  विक्री विभागाकडे होते. तसेच बेचाळीसच्या आंदोलनात पंड्या नावाचा कंपनी कामगार  इस्लामपूर मोर्चात ब्रिटिशांच्या गोळीबारात शहीद झाला होता. 

           त्याचबरोबर पुढे अभ्यासाच्या निमित्ताने किर्लोस्करवाडीचा आणखी एक संदर्भ मिळाला.  किर्लोस्करवाडी हे गाव काही पूर्वी नव्हते. ते केवळ कंपनीमुळे वसले.आजूबाजूचे लोक व कामगारांनी मिळून हे वसवलेले गाव. पूर्वी किर्लोस्करवाडी स्टेशन ऐवजी 'कुंडल रोड स्टेशन' असे स्टेशनचे नाव होते. याचे कारण त्याची हद्द कुंडल ग्रामपंचयातीत होती.  महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना  डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या वतीने 1914 साली   मातंगांचे एक स्वयंपूर्ण खेडे वसवायचे होते. त्यासाठी ब्रिटिशांकडून जुन्या सातारा  जिल्ह्यात तीन चार जागा सुचवण्यात आल्या होत्या. त्या पाहणीसाठी शिंदे यांनी  भर उन्हाळ्यात हजार मैल प्रवास पायी तसेच बैलगाडीतून केला होता. त्यासाठी औंध संस्थानातील जंगल खात्याकडील पलूस-कुंडल रोडवर स्टेशनपासून तीन मैलांवर असणारी जागा शिंदे यांनी पहिली होती. हा  एक सामाजिक संदर्भ माझ्या मनामध्ये होता. ती जागा म्हणजे हाच परिसर.
                      
      किर्लोस्करवाडीतल्या वास्तव्यकाळातल्या अनेक आठवणी मनामध्ये रुंजी घालतात. दररोज संध्याकाळी  प्रा. प्रदीप खांडेकर, डॉ.संतोष कोटी व  डॉ. संजय पवार असे मिळून आम्ही फिरायला जायचो. ते दिवस नोकरीच्या सुरुवातीचे दिवस होते. कॉलेज विनाअनुदानित होते.  कुठून या प्रदेशात आपण आलो आहोत अशी भावनाही मधून मधून व्हायची.  भविष्याची चिंता आणि एकटेपणाच्या सावल्या आजूबाजूला असायच्या. दिवस मावळतीस विरंगुळा म्हणून आम्ही रेल्वे स्टेशनवर जायचो. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म पासून दूरवर गर्दी नसणाऱ्या बाजूने आम्ही मोठी चक्कर मारायचो. नुकतीच सहाच्या दरम्यानची  रेल्वे येऊन गेलेली असायची किंवा यायची असायची. रेल्वेतून उतरणारे, चढणारे प्रवासी, बाकड्यावर खूप वेळ बसून असणारे खेडूत,  लहान मुलांच्या अप्रूप नजरा, त्यांचे बागडणे, काही  जेष्ठ नागरिक  स्टेशनवर फिरायला आलेले, त्यांचे गप्पांचे फड, अशी दृश्ये दिसायची. थोड्या वेळासाठी स्टेशनला सजीव रंग यायचा. स्टेशन आणि प्लॅटफॉर्मला धांदलगडबडीचे,आवाजाचे पंख फुटायचे.  त्या चित्राचे अप्रूप वाटायचे. दहा मिनिटातच रेल्वेस्टेशन सामसूम व्हायचे.

दत्तात्रय मानुगडे यांच्याविषयी

           त्यावेळी दत्तात्रय मानुगडे यांना पाहिल्याचे आठवते. हाफ शर्ट, हलकासा कद, आपल्याच धुंदीत शरीराला झोल देत चालण्याची  लकब,  येणाऱ्या-जाणाऱ्याला त्यांची आस्थापूर्वक बोलण्याची पद्धत. तोंड पानाने रंगलेले, हातामध्ये दिवा किंवा  कंदील किंवा कामाचा काही ऐवज आणि चालत ते फाटकाच्या बाजूने दिसायचे किंवा परत येताना दिसायचे. कुणीतरी म्हणाले की हे पुस्तके लिहितात.  पण त्यावेळेस बोलण्याचा धाडस वगैरे झाले नाही. नंतरही मधूनमधून ते काही कथा-कादंबऱ्या लिहितात त्याविषयी ऐकलेले होते.

          दत्तात्रय मानुगडे हे रेल्वे स्टेशन कार्यालयातून चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून निवृत्त झाले.  आयुष्यभर  प्रामाणिक आणि कर्तव्यभावनेने, निरलसपणे त्यांनी  नोकरी  केली.  कधीतरी त्यांना हा लिहिण्याचा छंद लागला आणि तो ते आयुष्यभर जपत आले आहेत. आपल्या छोट्याशा नोकरीत त्यानी अक्षरांशी, शब्दांशी जोडून घेतले. त्यांचे त्यांचे म्हणून एक भावविश्व शब्दांतून रचत आले. खूप लहानपणीच त्यांनी कथा लिहून ठेवल्या परंतु त्या प्रसिद्ध व्हायला तीस वर्षचा कालावधी लागला. सांस्कृतिक केंद्रापासून सर्वार्थने दूर असलेल्या एका चिमुकल्या गावातील अज्ञात व्यक्तीचे लेखन कोण छापणार.

        कदाचित सांस्कृतिक क्षेत्रातील तथाकथित मंडळींना त्यांचे लेखन रूढ श्रेणीबद्ध कप्प्यात  बसणारे वाटत नसले. म्हणूनही एवढी वर्षे लागली असतील. परंतु त्यांचे म्हणून एक जग आहे. लिहिण्याच्या नादामुळे आपण वेगळे काही तरी करत आहोत ही भावना त्यांच्या मनात आहे.  वडील आणि आजीच्या  मृत्यूचे लहानपणीच्या आघाताने व्याकुळ झाले.  गरिबी आणि  प्रतिकूल परिस्थितीमुळे आयुष्याच्या एका टप्प्यावर रेल्वे मध्ये नोकरीस लागतात. आणि लिहिण्याच्या छंदामुळे मानवी जीवनाकडे एक प्रकारच्या सद्भावनेनं आणि कृतज्ञताभावनेने ते पाहतात. त्यांच्या वाङ्मय गुणवत्तेबद्दल मध्यमवर्गीय समीक्षादृष्टी  काहीएक मतभेदही व्यक्त करू शकतील. मात्र दररोजचा नित्यक्रम, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे जग, स्टेशनलगत घर आणि या मधल्या काळामध्ये त्यांनी शब्दांशी, स्व अनुभवाशी जोडून घेऊन त्याचे  कथनात रूपांतर केले.  नाटकं लिहिली, कथा कादंबऱ्या लिहिल्या. आधीच्या पिढीतील काही लोकप्रिय आणि ग्रामीण जीवनाचे चित्रण करणाऱ्या लेखकांचा प्रभाव परिणाम त्यांच्या लेखना विषयावर झाला असावा. आपण यांच्या सारखे लिहावे, ही भावना त्यांच्यात मनोमन आहे. त्याच्यातून एक सश्रद्ध  भाबडेपण देखील येऊ शकते.  अर्थात हे भाबडेपण नाकारात्मक दृष्टीने  न समजता ते सकारात्मक दृष्टीने समजून  घेता येते. ग्रामीण जीवनातील सुख, दुःखाच्या गोष्टी, गावगाडा आणि शेती संस्कृतीतील अनेक कहाण्या त्यांनी सांगितल्या. चौफेर लेखन केले. लोकनाटकाच्या बाजाचे लेखन केले. फार्सीकल विनोदात्म लेखन केले. गतकाळातील स्मरण आठवणीचा पाठलाग त्यांच्या लेखनात आहे. भिलवडी, जुळेवाडी, धनगाव, आणि किर्लोस्करवाडी असा ग्रामीण प्रदेश त्यांच्या लेखनात आहे.  ग्रामीण माणसांच्या भल्याबुऱ्या अनुभवाच्या तसेच व्यक्तिचित्रनात्मक कथा लिहिल्या. तसेच सामूहिक भावनेने जतन केलेल्या नैतिक शहाणपणची आस त्यांच्या लेखनातून कायम व्यक्त झालेली आहे.

         त्यांच्या  लेखन व कार्यसेवेचा  गौरव  होतो आहे ही समाधानाची बाब आहे.  एखाद्या छोट्या गावांमध्ये छोट्या रेल्वे स्टेशनवर तीही छोट्या श्रेणीची नोकरी करणाऱ्या व्यक्तीने केलेल्या कार्याचा गौरव लेखक आणि परिसरातील  मंडळी करत आहेत यात एक प्रकारची सांस्कृतिक कृतज्ञतेची भावना जशी आहे तशीच मानवी सहभावाची  भावना देखील आहे.  रेल्वे स्टेशन एखाद्या लेखकाला, व्यक्तीला काय देते आणि आणि लिहिणारा स्टेशन आणि समाजाला काय देतो हे परस्परस्वरूपी दुहेरी नाते त्यांच्या कामात पाह्यला मिळते.  

      त्यांच्या लेखनाविषयाच्या  आस्थाकेंद्राकडे पाहत असताना एक गोष्ट जाणवते की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये रेल्वे संस्कृती एक दळणवळणाचा संपर्कसाधनांच्या एक महत्त्वाचा संदर्भबिंदू राहिला आहे. आधुनिकीकरणाच्या टप्प्याचा  भाग म्हणून रेल्वे संस्कृती भारतीय साहित्यामध्ये आली आहे. ती निरनिराळ्या दृष्टीने. जाती खुल्या होण्याच्या दृष्टीपासून ते 'तिकडू'न आणलेल्या गोष्टींपर्यन्त. पडद्यावरील सिनेमाने त्यास रोमँटिक रंग प्राप्त करून दिले. रेल्वे ड्रायव्हर, रेल्वे कर्मचारी व रेल्वे संस्कृती संबंधित काही चित्रण भारतीय साहित्यामध्ये आलेले आहे  ते कधी रोमँटिक भावनेने तर कधी वास्तववादी अर्थाने.  मात्र आधुनिक काळातील मानवी संपर्क साधनांचा तो  एक महत्त्वाचा परिप्रेक्ष्य आहे. रेल्वे संस्कृतीतील जीवन आणि त्याविषयीच्या कथा-कहाण्या अजूनही मराठी साहित्यात  अलक्षित आहेत. तेथील कार्यपद्धती, मानवी जीवनव्यवहार, भावसंबंध, प्रवाशांच्या अजिबोगरीब गोष्टी साहित्यामध्ये येऊ शकतात. आणि अशी भूमी वाचकांच्या कायम प्रतिक्षेत आहे. म्हणून मानुगडे यांनी भविष्यामध्ये रेल्वे संस्कृतीवरील अनेक गोष्टी वाचकांना सादर कराव्यात. पूर्वलक्षी परंपरेतील काही प्रभावापासून अलग होऊन प्रत्यक्षातल्या जगण्याला त्यांनी  कल्पित सर्जनाच्या पातळीवर नेऊन हे नवजग आपल्या वाङ्मयातून मांडावे अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या लेखनाला शुभेच्छा देतो.

                                                                                                                                          डॉ. रणधीर शिंदे

Comments

  1. सर कुंडल आणि किर्लोस्करवाडी पुन्हा एकदा सजीव झाली...तिला नवं रूप आलं.जगण्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यात ही तुम्ही तुमचा भूतकाळ जागा केला हे तुमच्यातील संवेदनशीलतेचे उदाहरण आहे.

    ReplyDelete
  2. रणधीर अगदी समर्पक आणि सुंदर लिहिलंय. असे तुझे अनेक अनुभव वाचायला सर्वांनाच आवडेल

    ReplyDelete
  3. सर खूप छान आठवणी.

    ReplyDelete
  4. रणधीर, फारच सुंदर लेख!
    आपल्या याच काळातल्या वास्तव्यात मी ही कुंडलला आलो होतो

    ReplyDelete
  5. सुंदर वर्णन केले आहे सर...

    ReplyDelete
  6. सुंदर लिहिले आहे सर...

    ReplyDelete
  7. काळ आणि परिसर उभा केलात तुम्ही

    ReplyDelete
  8. वाडी आणि कुंडलच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.. खूप सुंदर लेखन सर..!

    ReplyDelete
  9. अप्रतिम. वर्णन थेट तुम्ही अनुभवलेल्या, पाहिलेल्या प्रदेशात घेऊन जाते. "प्लॅटफॉर्मला धांदलगडबडीचे,आवाजाचे पंख फुटायचे." किती बोलके वर्णन आहे हे. सुंदर.

    ReplyDelete
  10. काळ आणि परिसराकडे पाहण्याचे समिक्षणात्मक दृष्टी चित्रण...
    'भारतीय साहित्य आणि रेल्वे संस्कृती' असा एका वेगळ्या विषय संशोधकांसमोर आपण आणलात...
    बाकी,
    दत्तात्रय मानगुडेंच व्यक्तीचित्रण अप्रतिमच

    ReplyDelete
  11. काळ आणि परिसराकडे पाहण्याचे समिक्षणात्मक दृष्टी चित्रण...
    'भारतीय साहित्य आणि रेल्वे संस्कृती' असा एका वेगळ्या विषय संशोधकांसमोर आपण आणलात...
    बाकी,
    दत्तात्रय मानगुडेंच व्यक्तीचित्रण अप्रतिमच

    ReplyDelete
  12. खूपच छान आठवणी👌👌

    ReplyDelete
  13. सर लेख दुसऱ्यांदा वाचला.पुन्हा नव्याने तोच अनुभव आला.

    ReplyDelete
  14. Thanks to Lockdown...👍👍
    लॉकडाऊन नसते तर ह्या आठवणी तुम्हाला लिहायला आणि आम्हाला वाचायला वाचायला मिळल्या नसत्या.
    खूप छान वर्णन .... किर्लोस्करवाडी डोळ्यासमोर उभी राहिली.... आर. के. लक्ष्मण च्या 'मालगुडी डेज' ची.आठवण.झाली.... धन्यवाद आणि अभिनंदन🍄🍄👍👍

    ReplyDelete
  15. हा लेख तर मला आवडलाच; पण ब्लॉगही आवडला. इस्लामपूरहून पलूसला जाताना मी फक्त एकदा हा परिसर पाहिला.आता तो परिसर नव्या संदर्भांसह पुन्हा डोळ्यांसमोर आला.

    ReplyDelete
  16. सर, या परिसराबद्दल, इथल्या भूमीबद्दल तुम्ही अत्यंत आत्मियतेने लिहले आहे. येथील इतिहासाबद्दल नवं काहीतरी वाचायला मिळालं.

    सगळं रोज पाहतोय. आता अजून बारकाईने पाहता येईल.
    जाणीवकक्षा विस्तारल्या....

    ReplyDelete
  17. सुंदर वर्णन केले आहे मला पण खूप आवडलं मी पण ह्या भागात बऱ्याच वर्ष झाले विसरून गेलो होतो आठवणी आणि पुन्हा जागे झाल्या थँक्स

    ReplyDelete
  18. सर
    अतिशय सुंदर व भावपूर्ण वर्णन

    ReplyDelete
  19. तुझ्यामध्ये एक उत्तम ललित लेखक वस्तीला आहे. तुझ्यातल्या समीक्षकाला त्याच्यावर कुरघोडी करायला द्यायची नसेल, तर हे असं अधून मधून लिहीत जा.

    ReplyDelete
  20. तुझ्यामध्ये एक उत्तम ललित लेखक वस्तीला आहे. तुझ्यातल्या समीक्षकाला त्याच्यावर कुरघोडी करायला द्यायची नसेल, तर हे असं अधून मधून लिहीत जा.

    ReplyDelete
  21. तुझ्यामध्ये एक उत्तम ललित लेखक वस्तीला आहे. तुझ्यातल्या समीक्षकाला त्याच्यावर कुरघोडी करायला द्यायची नसेल, तर हे असं अधून मधून लिहीत जा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ज्ञानव्रती प्रा. वसंत पापळकर

चंद्रकांत मांडरे यांची चित्रशैली

नव्या धूळपेरणीसाठी - वारी